Hingoli Hostel Food Contamination : हिंगोलीच्या कळमनुरी येथे सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील जेवणात किडे व अळ्या निघाल्याचा आरोप विद्यार्थी व पालकांनी केला होता. तसे फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले होते. यानंतर आता हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सदरील प्रकरणाची तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. मात्र, या घटनेमुळे वसतिगृहातील मुलींच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
याआधीही या वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे आणि अपुऱ्या प्रमाणत जेवण दिले जात असल्याच्या तक्रारी पालकांकडून वारंवार करण्यात आल्या होत्या. मात्र, या तक्रारीकडे संबंधित प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंबीर आरोप पालकांनी यावेळी केला आहे. मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींसाठी असलेल्या या शासकीय वसतिगृहात स्वच्छतेचा पूर्णतः अभाव असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितलं आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या संबंधित अनेक प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आले आहेत.
हेही वाचा – मराठी एकीकरण समितीच्या दुटप्पी भूमिका, टोपेबाज लोकांपासून सावध राहा; शिंदे गट आक्रमक
घटनेची माहिती मिळताच अन्न व औषधी प्रशासन विभागाचे पथक वसतीगृहामध्ये दाखल झाले. या पथकाने तेल,डाळ, तांदूळ आदी धान्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. त्याचबरोबर शिजवलेल्या अन्नाचे देखील नमुने या पथकाने घेतले आहेत. या प्रकरणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल असे अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अनंत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. पंरतू वसतीगृहाच्या किचनमध्ये आज नव्याने धान्य आणले आहे. जुन्या धान्यातले नमुने घेतले नाहीत, असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय.
दरम्यान याप्रकरणी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून याप्रकरणी सखोल चौकशी करून अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली आहे.
या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या वस्तीगृहाकडे धाव घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते तर अळ्या आणि किडे आढळलेले जेवण तुम्ही खा असा आग्रह संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धरला होता, या प्रकारानंतर सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे यांनी तातडीने वस्तीगृहातील दोषींवर कार्यवाही सुरू केली आहे.






