इराणमधून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. इराणच्या दक्षिण भागातील बांदर अब्बास शहराजवळ असलेल्या शाहीद राजाई बंदरावर शनिवारी रात्री अंदाजे १२ वाजता एक भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत किमान १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सुमारे ७०० जण जखमी झाले आहेत, अशी माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. सरकारी टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट बंदरावरील एका कंटेनरमध्ये झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की, आसपासच्या अनेक इमारतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. होर्मोझगान प्रांताच्या क्रायसिस मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख मेहरदाद हसनजादेह यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात कंटेनरमध्ये स्फोट झाल्याचे आढळले आहे. स्फोटानंतर बंदर परिसरात मोठा गोंधळ उडाला. मदत आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून जखमींना जवळील होर्मोझगान प्रांतातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अनेक जखमींची अवस्था गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, सुरक्षेच्या दृष्टीने बंदराचा मोठा भाग सील करण्यात आला आहे आणि सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या भयंकर स्फोटामुळे संपूर्ण इराणमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सरकारी यंत्रणांकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच अधिकृत तपासणी अहवालाची प्रतीक्षा करण्याचे सांगण्यात आले आहे.











