Khadse house theft : आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातील शिवराम नगर येथील निवासस्थानी चोरी झाल्यानं मोठी खळबळ उडाली. मात्र, खडसे यांनी आज चोरीसंदर्भात काही मोठे खुलासे केले आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे पोलिसही अचंबित झाले आहेत. ते म्हणाले, चोरांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रेकी करून माझ्या घरातील भ्रष्टाचार संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे, सीडी आणि पेन ड्राईव्ह चोरून नेण्यात आली आहेत. त्याचबरोबर घरातील ८ तोळे सोनं आणि ३५ हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे.
एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात आणखीन एक गंभीर आरोप केला आहे. हे कोणत्या भुरट्या चोरांचे काम नाही. चोरांनी पळवून काही शिल्लक राहिलेले कागदपत्रं, सीडी आहेत ते मी पोलिसांना दाखवणार असून त्या दृष्टीने तपास करण्याबाबत त्यांनी विनंती करणार आहे. ज्या पद्धतीने ही चोरी झाली आहे ती कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली आहे का? या चोरीमागे नेमका कोणाचा हात आहे हे तपासणे आवश्यक आहे.
चोरी कोणाच्या सांगण्यावरून झाली का?
ज्या पद्धतीने ही चोरी झाली ती कुणाच्या सांगण्यावरून ही चोरी झाली का? आत्ताच मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही, आक्षेप सुद्धा मी घेणार नाही, असे देखील खडसे यांनी म्हटले आहे. चोरट्यांचा केवळ चोरी करणे हा उद्देश नव्हता तर माझ्या घरातली कागदपत्र पेन ड्राईव्ह सीडी सोडून नेण्याचाच उद्देशाने ही चोरी झाल्याचा दावा खडसेंनी केला आहे. जळगावातील निवासस्थानी चोरी झाल्यानंतर आज आमदार एकनाथ खडसे यांनी पाहणी करत घटनेची माहिती घेतली त्यानंतर पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
चोरांच्या दृष्टीने रद्द, माझ्या दृष्टीने महत्ताची कागदपत्र
ही चोरी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली आहे. जे काही कमी महत्त्वाची कागदपत्रे ती खालच्या मजल्यावर होते, तर अती महत्त्वाची कागदपत्रे ही मी माझ्या बेडरुम मध्ये ठेवलेली होती. बेडरूम मधील सर्वच्या सर्व कागदपत्र गहाळ झालेले दिसतायत. चोरांच्या दृष्टीने ती रद्दी होती तर माझ्या दृष्टीने ती महत्त्वाची कागदपत्रे होती.
ही ‘चोरी’ नसून ‘डाका’
चोरीची घटना नियोजित असल्याचे सांगत, त्यामागे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. ही चोरी नसून डाका असल्याचेही त्यांनी म्हटले. या संदर्भात मी तातडीने लेखी तक्रार करून तपास जलद गतीने करण्याची विनंती करणार आहे. योग्य वेळ आल्यावर चोरीसंदर्भात सर्व स्पष्ट करीन असे आमदार एकनाथ खडसे म्हणाले.






