न्यायालयाच्या आदेशानुसार नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीण गुजरातच्या वनतारा येथे पाठवण्यात आली आहे. मात्र त्यानंतर या हत्तीणीला कोल्हापूरला परत आणण्यासाठी जनभावना उसळली आहे. अनेक लोकप्रतिनिधी या हत्तीणीला परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार सतेज पाटील यांनीही यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरु केली होती. या मोहिमेला कोल्हापूर जिल्ह्यासह देशभरातील तब्बल सव्वा दोन लाख नागरिकांनी सहभाग देत महादेवी हत्तीण नांदणी मठातच राहावी, अशी मागणी केली आहे. अवघ्या 2 दिवसांत या स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शनिवारी सकाळी या सर्व सह्यांच्या फॉर्मचे नांदणी मठात पूजन करून, ही सर्व पत्रे आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत रमणमळा पोस्ट ऑफिस येथून राष्ट्रपतींना पाठवण्यात आली. यावेळी हत्तीप्रेमी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.












