मध्य प्रदेशात सध्या मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातलं असून राज्यात पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे. जून-जुलै महिन्याच्या कालावधीत आतापर्यंत २७५ नागरिकांचा मृत्यू, १,६५७ जनावरांचा मृत्यू, तर २५४ रस्ते आणि पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असून शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. दरम्यान, शासनाने मदत व बचावकार्य वेगाने राबवण्याचे आदेश दिले असून SDRF व NDRF पथकं सक्रिय करण्यात आली आहेत. या भीषण नैसर्गिक संकटामुळे राज्यात भीतीचं आणि हतबलतेचं वातावरण पसरलं आहे.












