हिंदू धर्मात विवाह हा केवळ दोन व्यक्तींमधील सामाजिक करार नसून, तो एक पवित्र, धार्मिक आणि आध्यात्मिक संस्कार मानला जातो. हा संस्कार म्हणजे दोन आत्म्यांचा सात्विक संगम, जो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांच्या पूर्ततेसाठी आवश्यक आहे. या बंधनात स्त्रीचा सहभाग कमी नाही, उलट तिच्याशिवाय पुरुष पूर्णत्व, धर्मपालन किंवा पुरुषार्थ प्राप्त करू शकत नाही. स्त्री ही धर्मपत्नी व अर्धांगिनी म्हणून मान्य आहे. वेदांमध्ये विवाहाचे वर्णन सहजीवनाच्या आध्यात्मिक प्रवासाप्रमाणे केले गेले आहे. नवरा-बायको हे एकमेकांचे सहधर्मी व आयुष्यभराचे सहप्रवासी असतात.
2000 च्या अगोदर झालेल्या बहुतेक लग्नांमध्ये लग्न जुळवताना मूलतः माणूस आणि त्याचे कुटुंब यांची पारख केली जायची. मुलगा निर्व्यसनी आहे का? घरात किती माणसं आहेत? घरात वातावरण कसं आहे? मुलगा बाहेर आणि घरी कसा वागतो? मोठ्यांशी वागणं, लहानांशी संवाद करतो हे सगळं पाळखल जायचं. हेच निकष मुलीबाबतीतही लावले जात. पण मुख्य भर असायचा तो म्हणजे समजुती, जबाबदारी, आणि कुटुंबाच्या रचनेत मिसळून जगण्याची तयारी यावर. या जोडप्यांनी एकमेकांबरोबर तक्रारी न करता, एकमेकांना समजून घेत, समजूतदारपणे आयुष्य जगायला शिकलं. या पिढीच्या अपेक्षा कमी आहेत, पण त्यांची स्वप्नं समाधान आणि एकत्रित आयुष्य जगण्याची आहेत. ते छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत त्याचं उत्सव साजरा करतात. त्यामुळे त्यांची लग्नं स्थिर, टिकाऊ आणि समाधानकारक ठरली आहेत.
2000 नंतरच्या काळात लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. आता लग्न म्हणजे एक अपेक्षांचा यादी बनली आहे आणि ती यादी किराणा सामानाच्या यादीपेक्षाही लांब असते. मुलींच्या अपेक्षा आता अशा असतात; मुलगा मुंबई-पुण्यासारख्या शहरात नोकरीला पाहिजे, दिसायला मैत्रिणीच्या किंवा बहिणीच्या नवर्यापेक्षा चांगला, पगार कमीत कमी 5 आकडी, 25–30 व्या वर्षी स्वतःचं घर, आई-वडिलांपासून वेगळं राहणं, चारचाकी गाडी आणि ही यादी थांबतच नाही. या अपेक्षांमुळे मुलं नाराज होत आहेत, काही लग्नाकडे पाठ फिरवत आहेत, तर काही प्रेमसुरी कल्पनांमध्ये अडकून पडलेत. लग्नानंतरही अनेक जण सतत खरेदी, ब्रँड्स आणि हौशी मागण्यांमध्ये गुंतून पडले आहेत. आज विवाह हा एक पवित्र बंध न राहता, एक गरज किंवा व्यवहार बनला आहे. परिणामतः नाती टिकत नाहीत, घटस्फोटाचं प्रमाण वाढत आहे, आणि आता काही जण तर लग्न न करण्याची जीवनशैली स्वीकारत आहेत.
सध्याच्या काळात लग्न संस्थेवरचा विश्वास डळमळीत होत चालला आहे. 2025 मध्ये घडत असलेल्या धक्कादायक घटना या बदलत्या मानसिकतेचा आरसा दाखवत आहेत. सोनम प्रकरणात, पत्नीने थेट हनीमूनला जाऊन नवऱ्याचा खून केला, तर याआधी एका नेव्हीत काम करणाऱ्या जवानाचा मृतदेह ड्रममध्ये आढळून आला, ज्यात पत्नी आणि तिच्या प्रियकराचा सहभाग होता. अशा कित्येक घटना समाजात घडत आहेत, ज्या पाहता लग्न आता प्रेमाचं नव्हे, तर धोकेबाज व्यूहाचं रूप घेत असल्याचं चित्र दिसतंय. या सगळ्यांमुळे अनेकांना लग्न हे आत्महत्येसारखं वाटत आहे, जिथे विश्वास, समर्पण आणि समजूत यांना फारसं स्थान राहिलेलं नाही. परिणामी, समाजात लग्न न करण्याची वृत्ती आणि एकटे जगण्याचा पर्याय स्वीकारणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे.
- लग्न करायचंय ना? मग हे 10 प्रश्न स्वतःला नक्की विचारा:
- मी खरंच लग्नासाठी तयार आहे का?
– मनाने, विचाराने आणि जबाबदारीने? - माझ्या जोडीदाराकडून खूप जास्त अपेक्षा तर नाहीत ना?
– तो/ती परफेक्ट असण्याची अपेक्षा ठेवतो का? - माझं करिअर आणि स्वप्नं लग्नानंतरही चालू ठेवता येतील का?
- आपण दोघं आयुष्य कसं जगायचं यावर एकमत आहोत का?
- मी एकटं असणं स्वीकारलंय का, की फक्त एकटेपणा टाळायला लग्न करतोय?
- भांडण झालं तर मी शांतपणे बोलून ते सोडवू शकतो का?
- पैशाच्या आणि घरकामाच्या जबाबदाऱ्या मी शेअर करू शकतो का?
- कुटुंब, सासर, नातेवाईक यांच्याशी जुळवून घेण्याची तयारी आहे का?
- भूतकाळ विसरून नव्या नात्याला पूर्ण मनाने स्वीकारू शकतो का?
- लग्नाचा निर्णय माझा आहे का, की कुणाच्या दबावाखाली घेतोय?












