राज्यभरात आगामी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच अनेक राजकीय पक्ष बैठकी घेऊन त्यांच्या पक्षाचा विजय व्हावा म्हणून वेगवेगळ्या योजना आखत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची राज्यभरात जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. भारतीय जनता पक्षाची महत्वाची बैठक आज मुंबईमध्ये पार पडली तेव्हा या बैठकीत मोठी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
मुंबईमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने बैठक घेतली त्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या मुंबई अध्यक्षांची घोषणा केली आणि यात एका आक्रमक नेत्याची वर्णी लागली असून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अनेक भाजप पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अमित साटम यांच्याकडे भाजप मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. यामुळे मुंबई महापालिकेचे राजकीय चित्र बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजप मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली गेली आहे ते अमित साटम हे भाजपमध्ये 2000 पासून राजकारणात सक्रिय आहेत. ते मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक राहिले असून ते मुंबईतील युवा मोर्चा आणि स्थानिक समित्यांमध्ये ही कार्यरत होते. त्यातच त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरून अंधेरी पश्चिम विधानसभा त्यांनी लढवली होती. तेव्हा दोन वेळा आमदार असलेले काँग्रेसचे अशोक जाधव यांचा पराभव अमित साटम यांनी केला. आणि तिथून त्यांच्या राजकीय वाटचालीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. अमित साटम यांनी आमदार म्हणून मतदारसंघात रस्ते दुरुस्ती, जलपुरवठा, प्रदूषण नियंत्रण आणि बेकायदेशीर अतिक्रमण यांसारख्या अनेक मुद्द्यांवर काम केले. त्यांनी मुंबईतील ट्रॅफिक सुधारली असल्याने अमित साटम यांची एक विशेष ओळख आहे.
समाजाचे भान असलेला नेता अशी त्यांची ओळख असून भाजपच्या माध्यमांतून आमदार साटम स्थानिक स्तरावर आरोग्य, शिक्षण आणि युवा विकासाच्या कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असतात. महामारी कोविडच्या काळात आमदार साटम यांनी वाखाण्याजोगी कामगिरी केली होती. वर्ष 2014, 2019 आणि 2024 या तिन्ही वर्षी त्यांनी विधानसभेचे आमदारकीचे पद सांभाळले, त्यात ते आधीपासून भाजपमध्ये असल्यामुळे त्यांच्या मतदारसंघात त्यांची निष्ठावान नेता म्हणून ओळख आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमदार अमित साटम यांची निवड फायद्याची ठरू शकते…
– प्रीती हिंगणे (लेखिका)












