गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची भीषण धमकी देणारा व्यक्ती अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर आलेल्या अज्ञात मेसेजमुळे खळबळ उडाली होती. या मेसेजमध्ये दावा करण्यात आला होता की, 14 पाकिस्तानी अतिरेकी मुंबईत पोहोचले असून त्यांनी 34 गाड्यांमध्ये एकूण 400 किलो RDX लपवले आहे.
या बॉम्बस्फोटामुळे सुमारे 1 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा खळबळजनक दावा या मेसेजमध्ये करण्यात आला होता.
धमकी देणारा नोएडामधून अटकेत
या प्रकरणाचा गंभीरतेने तपास करत मुंबई पोलिसांनी नोएडा पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव अश्विनी असून, तो बिहारचा मूळ रहिवासी आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो नोएडामध्ये वास्तव्यास होता. अटक करून अश्विनीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याचा मोबाईल जप्त करून सायबर सेल तपास सुरू आहे.
मुंबईत कडेकोट सुरक्षा, यंत्रणा अलर्ट मोडवर
धमकी मिळताच मुंबई पोलिस, अँटी टेरर स्क्वॉड (ATS), सायबर सेल आणि केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी तत्काळ पावले उचलली. मुंबईभर गणपती विसर्जनाच्या मिरवणूक मार्गांवर, रेल्वे स्थानकांवर, मॉल्स आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
धमकीचा मेसेज नेमका होता तरी काय?
- 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब लपवले असल्याचा दावा
- 400 किलो RDX चा वापर होणार
- ‘लष्कर-ए-जिहादी’ नावाच्या कथित संघटनेचा उल्लेख
- 14 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतात प्रवेश केल्याचा दावा
अशा धमक्या यापूर्वीही आल्या होत्या
- मुंबईला याआधीही अशा स्वरूपाच्या बनावट धमक्या आल्या आहेत, जसे की:
- वरळीतील Four Seasons हॉटेलला बॉम्बची धमकी
- 14 ऑगस्ट रोजी ट्रेनमध्ये स्फोटाची धमकी
- 26 जुलै रोजी CSMT स्थानकाला लक्ष्य करण्याची धमकी
या सर्व घटनांमध्ये कोणतीही स्फोटक सामग्री सापडली नव्हती, परंतु नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.