Waste of money : अमरावती महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी विशाल काळे हे शासकीय वाहनाचा गैरवापर करीत असल्याचे समोर आले आहे. महानगरपालिकेची अधिकृत गाडी घरगुती कामांसाठी वापरली जात असल्याचे व्हिडिओद्वारे समोर आले आहे.
हेही वाचा – शिक्षण राज्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका, १०वी, १२वी परीक्षेतील सर्व काॅपी प्रकरणाची चौकशी आदेश
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वाहनाचा वापर त्यांची पत्नी व मुलीला शाळेत सोडण्यासाठी आणि शाळेतून आणण्यासाठी करण्यात येत असल्याचे दिसून येते. काही व्हिडिओंमध्ये अधिकाऱ्यांची पत्नी मुलीला शाळेत सोडताना दिसून येत आहे, तर इतर व्हिडिओंमध्ये मनपाचा ड्रायव्हर मुलीला शाळेतून घरी नेत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील मूलभूत कामांसाठी निधी अपुरा
जनतेच्या कराच्या पैशातून चालणाऱ्या वाहनांचा असा वापर होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील मूलभूत कामांसाठी निधी अपुरा असल्याच्या तक्रारी असताना अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या गैरवापरामुळे नाराजी वाढली आहे.
सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई
दरम्यान, मनपा आयुक्त व नवनिर्वाचित भाजप महापौर या प्रकरणात काय भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करू अशी प्रतिक्रिया महापौर श्रीचंद तेजवानी यांनी दिली.








