Nitin Gadkari | आज (7 एप्रिल) भारतीय जनता पक्षाला (BJP) 46 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने नागपूरमध्ये (Nagpur) भाजपचा स्थापना दिवस (BJP Foundation Day) साजरा करण्यात आला. तर या कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जोरजार फटकेबाजी केली. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत नितीन गडकरींनी नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे कान टोचले. सत्ता मिळाली म्हणून माज दाखवू नका, असं खोचक वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.
नितीन गडकरींनी काय केला सूचक वार? कार्यकर्त्यांचे टोचले कान
नितीन गडकरींनी आपल्या भाषणात जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, पक्षाचा खरा कणा हा कार्यकर्ता असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या कष्टावरच भाजपने मोठी प्रगती केली आहे. मात्र, काही लोकांना दिवसरात्र फक्त निवडणुकाच दिसत असतात. ते सतत माझं काय होणार, मला संधी मिळणार का, याच विचारात असतात. पण आम्ही त्यांना काही संधी द्यायला आलेलो नाही. आम्ही समाज बदलायला आलो आहोत, हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे, असं नितीन गडकरी म्हणाले.
राजकारणात जशी पिढी बदलते तसेच नेतृत्व देखील बदलते. पण, नेतृत्वाच्या पोटातून कधीही नवीन नेतृत्व समोर येता कामा नये. नवीन नेतृत्व हे कार्यकर्त्यांमधून घडायला हवे. जरी सत्ता मिळाली तरी माज दाखवू नता. कारण जो खुर्चीवर बसतो तो कधीतरी त्यावरून उठणारच आहे. जर तो उठला नाही तर देव त्याला घेऊन जाईलच, असा खोचक टोला नितीन गडकरींनी लगावला.
पुढे नितीन गडकीरींनी पंतप्रधानपदाबाबत सूचक वक्तव्य केलं. ते म्हणाले की, 40 वर्षांपूर्वी भाजपची स्थापना झाली. न्यू इंग्लीश महाल येथे राम जेठमलानी आणि शांतीभूषण यांच्या उपस्थितीत भाजपची स्थापना झाली होती. त्यावेळी मुंबईमध्ये अधिवेशन झालं होतं. त्यादरम्यान छागला यांनी सांगितलं होतं की, भावी पंतप्रधान येणार आहेत आणि ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या रूपाने सिद्ध झाले. अटल बिहारी यांनी अंधार मिटणार अशी भविष्यवाणी केली होती आणि आज ती खरी ठरली आहे.
भाजपची स्थापना पंतप्रधान बनवण्यासाठी झाली नाही, असा सूचक वार नितीन गडकरींनी केला. तसेच ते पुढे म्हणाले की, अटल बिहारी सांगत होते की, देशाचे पंतप्रधान कोण होणार? हे महत्त्वाचं नाही, तर आपला देश कसा मजबूत होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आमचा पक्ष हा कोणत्याही धर्म विरोधात नाही, जातीवादी नाही. आम्ही अनेक स्वप्न, उद्दिष्ट पूर्ण केले आहेत, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.












