हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन वारकरी सांप्रदाय पंढरीची वारी करतात. पंढरीची वारी हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण आहे. संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणा-या महाराष्ट्राला एक धार्मिक, सांस्कृतिक, परंपरा लाभलेली आहे. आषाढ महिना सुरु झाला की, लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यत सर्वांना पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागते. पांडुरंगा चरणी लीन झालेल्या वारकऱ्याला हरिमय झालेल्या वातावरणात कशाचेही भान राहत नाही. पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांना लागलेली ओढ म्हणजे वारी. या वारीच्या निमित्ताने सद्भावनेचा, मानवतेचा संदेश जोपासून वारकरी सांप्रदाय प्रस्थान सोहळे पार पाडत ग्यानबा तुकाराम गजरात पंढरपुरी निघतात.

संतभूमी असलेल्या महाराष्ट्रासोबतच पिंपरी चिंचवड शहराला देखील वारकरी सांप्रदायाची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. वारकरी सांप्रदायातील महत्वाचे संत म्हणून ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांना ओळखले जाते. संतांचा आधुनिक विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी एकतेचा संदेश देत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगतगुरु श्री. संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पिंपरी चिंचवड शहरातून मार्गक्रमण करत पंढरपूर कडे प्रस्थान करतो.

महाराष्ट्रातील पवित्र आणि ऐतिहासिक यात्रा म्हणजे आषाढी पालखी. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीला विठोबा रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखो वारकरी सांप्रदाय दर्शनासाठी, माऊलीला भेटण्यासाठी जातात. विशेषतः वारीमध्ये संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं मुख्य आकर्षण असते. या पालख्यांना उच्च स्थान देऊन आनंदी आणि भक्तिभावाच्या गजरात पंढरीला नेले जाते. या भक्तिमय वातावरणात भाविक विठोबा आणि रुख्मिणीचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहून जय हरी विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरीच्या गजरात दंग होतात.

यंदाचा आषाढीवारी सोहळा 2025 मध्ये सहभागी होणा-या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिंपरी चिंचवड शहर सज्ज आहे. या सोहळ्याच्या स्वागतासाठी आनंद गगनात मावेनासा आहे. या पालख्या विविध गावातून जातात आणि प्रत्येक गावात त्यांचे स्वागत होते. वारकऱ्यांना या मार्गावर विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घेता येते. पाऊले चालती पंढरीची वाट … म्हणत या भावपूर्ण भक्तिमय वातावरणात पालखी देहू आणि आळंदी वरून पंढरीच्या पांडुरंगी जाते. शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदाय वारीत सहभागी होतात. पण ही पालखी प्रथा कोणी सुरु केली हे तुम्हाला माहिती आहे का..?

पंढरीची वारी हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण आहे. याबाबत संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीषजी महाराज मोरे हे म्हणतात की, माझ्या घराण्याला पंढरपूर वारीची परंपरा अखंड सुरु आहे. संत तुकोबा महाराज सदेह वैकुंठाला गेले त्यापूर्वीपासून ही परंपरा अखंड सुरु आहे. संत तुकोबा महाराज यांच्या आई नित्यनियमाने पंढरीची वारी करत असत, हा वारसा पुढे चालून तुकोबारायांच्या घराण्यातील मुख्य पुरुष विश्वंभरबाबा यांच्याकडे आला. ते देखील नित्यनियमाने पंढरीची वारी करत. त्यानंतर संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायणबाबा यांनी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या रूपातील एक अंश आपल्या सोबत राहावा या हेतूने ही परंपरा पुढे चालू ठेवली. या परंपरेच्या माध्यमातून वारकरी ताळ मृदुंग, भगवी पताका खांद्यावर घेऊन तुकोबांच्या आणि माऊलींच्या पादुका सोबत घेऊन पंढरपूरला मार्गक्रमण करतात.

संत तुकोबाराय महाराज यांचे वंशज वर्षानुवर्षे चालवत आलेली ही परंपरा सुरुवातीच्या काळात दिंडी स्वरूपात होती. देहूतून संत तुकोबा महाराजांच्या पादुका तर आळंदी येथून ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका डोक्यावर घेऊन ही दिंडी पंढरपुरी मार्गक्रमण करायची. त्यानंतर दिंडीचे रूपांतर पालखीत झाले. यंदा या पालखीचे 338 वे वर्ष आहे. यंदाची पालखी सद्भावनेचा, मानवतेचा संदेश जोपासून वारकरी सांप्रदाय प्रस्थान सोहळे पार पाडत ग्यानबा तुकाराम गजरात पंढरपुरी प्रस्थान करतील. शेवटी, मुक्कामाच्या गावात पोहोचल्यावर रात्री झुंडात “ज्ञानोबा माउली तुकाराम” असा भारी घोष होतो….. जय जय राम कृष्ण हरी च्या गजरात सहभागी होऊया…… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा …… जय जय राम कृष्ण हरी….






