दिल्लीचा ऐतिहासिक लाल किल्ला येत्या डिसेंबर महिन्यात 10 दिवसांसाठी सर्वसामान्य पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे. 5 ते 14 डिसेंबरपर्यंत पर्यटकांसाठी लाल किल्ला पूर्णपणे बंद असणार आहे. दरम्यान, लाल किल्ल्यावर होणाऱ्या एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. भारत पहिल्यांदाच ‘अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणा’संदर्भातील युनेस्कोच्या 20 व्या सत्राचं आयोजन करत आहे. यासाठी लाल किल्ला हे ठिकाण निवडण्यात आलं आहे.
काय आहे कारण
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या सहसंचालक नंदिनी भट्टाचार्य साहू यांनी सांगितलं की, “अमूर्त सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्यासंदर्भातील सत्र 8 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान आयोजित केलं जाईल. या प्रतिष्ठित जागतिक कार्यक्रमात 24 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. त्यामुळं असा अंदाज आहे की, 1000 हून अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होतील, ज्यामध्ये सांस्कृतिक वारसा, संवर्धन आणि जागतिक वारसा व्यवस्थापनाशी संबंधित तज्ज्ञ आणि अधिकारी यांचा समावेश असणार आहे.”
अमूर्त सांस्कृतिक वारशाचं संरक्षण आणि जतनावर होणार चर्चा
हा कार्यक्रम प्रामुख्यानं जगभरातील अमूर्त सांस्कृतिक वारशाचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी ठोस उपाययोजना आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करणारा असणार आहे. सांस्कृतिक नेतृत्व आणि वारसा संवर्धनाच्या क्षेत्रात भारताची भूमिका मजबूत करण्यासाठी हे सत्र एक मोठी संधी असल्याचं म्हटलं जातं.
आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी कडक सुरक्षा व्यवस्था
लाल किल्ला परिसरात या आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळं सुरक्षा, तयारी आणि व्यवस्थेच्या पार्श्वभूमीर एएसआय आणि स्थानिक प्रशासनानं लाल किल्ला पर्यटकांसाठी तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी लाल किल्ल्यात आवश्यक व्यवस्था, स्टेज, बैठकीची जागा आणि सुरक्षा प्रोटोकॉल तयार केले जातील. तसंच गर्दी आणि सुरक्षेच्या दृष्टीकोणातून काही निर्बंध घालण्यात आले आहेत.
कधीपर्यंत किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार
दररोज हजारो देश-विदेशातील पर्यटक लाल किल्ल्याला भेट देतात. त्यामुळं या तात्पुरत्या बंदीचा पर्यटन उपक्रमांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, एएसआय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, ही बंदी केवळ एका विशिष्ट कालावधीसाठीच राहील आणि 14 डिसेंबरनंतर लाल किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी उघडला जाईल. तसंच युनेस्कोच्या या महत्त्वाच्या सत्राचं आयोजन केल्यानं जागतिक स्तरावर भारताचं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होईल. त्यामळं 5 ते 14 डिसेंबरपर्यंत लाल किल्ला जनतेसाठी बंद राहील.












