Rohtak University menstruation proof incident : हरियाणातील रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठात (MDU) घडलेली घटना संपूर्ण देशाला हादरवणारी ठरली आहे. महिला सफाई कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी पॅडचे फोटो काढून वरिष्ठांना पाठवण्यास भाग पाडल्याचा आरोप उघड झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल झाला असून विद्यापीठ प्रशासनानं तात्काळ कारवाई केली आहे.
महिला सफाई कर्मचाऱ्यांची धक्कादायक तक्रार : तक्रारकर्त्या महिलांनी सांगितलं की, 26 ऑक्टोबर रोजी क्रीडा संकुलात साफसफाईचं काम सुरु असताना दोन पुरुष पर्यवेक्षकांनी त्यांच्यावर लवकर काम संपवण्याचा दबाव आणला. यावर दोन महिलांनी मासिक पाळीमुळं वेदना होत असल्याचं सांगितल्यावर पर्यवेक्षकांनी त्यांच्या सॅनिटरी पॅडचे फोटो काढण्याचा आदेश दिल्याचा आरोप करण्यात आला. एका कर्मचाऱ्यानं नकार दिल्यावर तिला शिवीगाळ आणि नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश सांगत दबाव :
तक्रारदारांच्या मते, पर्यवेक्षकानं सांगितलं की हे आदेश विद्यापीठातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आले आहेत. दबावाखाली दोन महिला कर्मचाऱ्यांना वॉशरूममध्ये जाऊन सॅनिटरी पॅडचे फोटो काढावे लागले. हे संपूर्ण कृत्य महिलांच्या सन्मानावर घाला घालणारं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
रजा मागितल्यावर तपासणीचा आदेश :
दुसऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यानं सांगितलं की, मासिक पाळीमुळं काही तासांची रजा मागितल्यावर पर्यवेक्षकानं चिडून सगळ्यांनाच एकाचवेळी त्रास कसा झाला? असा प्रश्न विचारला. त्यानंतर एका महिला कर्मचाऱ्याला तपासणी करण्याचे आदेश देत फोटो काढण्यास सांगितलं गेलं. ही संपूर्ण घटना मानसिक आणि नैतिक छळ असल्याचं महिलांचं म्हणणं आहे.
विद्यापीठ प्रशासनाची तात्काळ कारवाई :
प्रकरण उघड झाल्यानंतर एमडीयू प्रशासनानं दोन पर्यवेक्षक आणि एका सहाय्यक प्राध्यापकाला निलंबित केलं आहे. कुलगुरुंनी या घटनेचा निषेध करत अंतर्गत तक्रार समितीला चौकशीचे आदेश दिले आहेत. विद्यापीठानं ही घटना गंभीरतेने घेतल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
महिला आयोगाचा तीव्र निषेध (Rohtak University menstruation proof incident)
हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी या घटनेला स्त्रीचा अत्यंत अपमान करणारी आणि लज्जास्पद बाब म्हटलं आहे. त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत विद्यापीठ आणि पोलिसांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. याप्रकरणी रोहतक पीजीआयएमएस पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध दोन पर्यवेक्षक आणि एका सहाय्यक प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सुरेंद्र सिंह भौरिया यांनी सांगितलं की, तपास सुरु असून आरोपींवर संबंधित कलमांनुसार कारवाई होणार आहे







