Sensex and Nifty crash : शुक्रवार सकाळी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना धक्का बसला. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी बाजार उघडताच बाजारानं मोठी घसरण पाहिली. सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स जवळजवळ 600 अंकांनी घसरून 82,720 वर पोहोचला, तर निफ्टी देखील 160 अंकांनी घसरून 25,348 च्या आसपास व्यवहार करत होता.
बाजर मंदावण्याची कारणं काय :
गुरुवारच्या किरकोळ वाढीनंतर, गुंतवणूकदारांना शुक्रवारी बाजार सावरेल अशी आशा होती, परंतु जागतिक बाजारपेठेतील कमकुवत संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळं देशांतर्गत बाजार मंदावला. आयटी, बँकिंग आणि धातू शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. दरम्यान, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप निर्देशांक देखील लाल रंगात व्यवहार करत आहेत. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की वाढत्या अमेरिकन बाँड उत्पन्नामुळं आणि मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळं गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला आहे. शिवाय, परदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीमुळे बाजारावर दबाव आला आहे.
अनेक कंपन्या तिमाही निकाल जाहीर करणार :
अनेक प्रमुख कंपन्या आज त्यांचे तिमाही निकाल जाहीर करणार आहेत. यामध्ये बजाज ऑटो, हिंडाल्को इंडस्ट्रीज, नाल्को, नायका, एजिस लॉजिस्टिक्स, अॅस्ट्राझेनेका फार्मा, डिव्हिस लॅबोरेटरीज, जेएसडब्ल्यू सिमेंट, कल्याण ज्वेलर्स, पेट्रोनेट एलएनजी, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, सिग्नेचर ग्लोबल, स्पाइसजेट, टोरेंट फार्मा, ट्रेंट, यूएनओ मिंडा आणि व्हीए टेक वाबाग यांचा समावेश आहे. गुंतवणूकदार या सर्व स्टॉकवर बारकाईने लक्ष ठेवतील.
आज हे स्टॉक लक्ष केंद्रित करतील -:
– भारती एअरटेल :
सीएनबीसी-टीव्ही18 च्या अहवालानुसार, सिंगटेल भारती एअरटेलमधील त्यांचा 0.8% हिस्सा विकण्याची तयारी करत आहे. या कराराचा ब्लॉक आकार अंदाजे ₹10,300 कोटी असेल आणि फ्लोअर प्राईस प्रति शेअर ₹2030 असा निश्चित करण्यात आला आहे.
– टीव्हीएस मोटर कंपनी :
टीव्हीएस मोटर कंपनीने एक्सेल इंडिया VIII (मॉरिशस) आणि एमआयएच इन्व्हेस्टमेंट्स वन बीव्ही सोबत करार केला आहे. कंपनी त्यांच्या अर्बन मोबिलिटी प्लॅटफॉर्म, रॅपिडो मधील हिस्सा विकत आहे. या कराराचे एकूण मूल्य ₹288 कोटी असल्याचं वृत्त आहे.
– रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) :
रेल विकास निगमने मध्य रेल्वेसाठी ₹272 कोटी किमतीच्या प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली (L1 बोली) लावली आहे. जर कंपनीने हा करार जिंकला तर ती तिच्या ऑर्डर बुकमध्ये लक्षणीय वाढ करू शकते.
– NBCC इंडिया :
NBCC इंडियाने ऑस्ट्रेलियन रिअल इस्टेट कंपनी गोल्डफिल्ड्स कमर्शियल्ससोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. हा सामंजस्य करार रिअल इस्टेट विकास प्रकल्पांशी संबंधित आहे, ज्यामुळं कंपनीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन संधी खुल्या होऊ शकतात.
– मारुती सुझुकी इंडिया :
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी, मारुती सुझुकी इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. नवी दिल्लीतील NCLT ने तिच्या उपकंपनी, सुझुकी मोटर गुजरातच्या मारुती सुझुकी इंडियासोबत विलीनीकरण योजनेला मान्यता दिली आहे. यामुळे कंपनीच्या उत्पादन आणि कामकाजात समन्वय वाढण्याची अपेक्षा आहे.






