war talks failed 21 hours : स्थळ पाकिस्तानातलं इस्लामाबाद. प्रसंग अमेरिका-इराण युद्ध थांबवण्याबाबत चर्चा. 21 तास चर्चा, खडाजंगी, खल पण परिणाम काय तर चर्चा निष्फळ… अमेरिकेचे उपराष्ट्रपतींचा चर्चेतून काढता पाय. मायदेशी रवाना. आता जगासमोर एकच प्रश्न. पुन्हा एकदा उडणार युद्धाचा भडका? अमेरिकेचे उपराष्ट्रपतींनी चर्चेतून काढता पाय घेतला असून अमेरिका पुढे काय निर्णय घेतंय हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा – मध्यपूर्वेतील युद्धासंदर्भात इस्लामाबादमधील चर्चा अयशस्वी; व्हान्स परतले, पुढं काय होणार?
पुन्हा युद्धाचा भडका?
इराण-अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर पाकिस्तानातील इस्लामबादेत जाऊन अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळात सुमारे 21 तास चर्चा झाली. परंतु हाती काय लागलं तर भोपळा! अमेरिका आणि इराण यांच्यात झालेली 21 तासांची चर्चा सपशेल फेल ठरली. इतकंच नव्हे, तर ही चर्चा अर्धवट सोडून अमेरिकेचं शिष्टमंडळ आल्यापावली मायदेशी परतलं.
इराण आणि अमेरिका यांच्यात खडाजंगी
सर्वांत धक्कादायक माहिती अशी की, अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा सुरू असताना दोन्ही देशाचे नेते अक्षरशः हातघाईवर आले होते. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याच्या मुद्यावरुन बैठकीत मोठा वाद झाला. तुर्किएच्या मीडियानं चर्चेदरम्यान मोठा वाद झाल्याची ही बातमी प्रसारित केलीये. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती समोर आलीये.
‘या’ कारणांमुळे चर्चा फिस्कटली?
मध्य पूर्वेतील आखाती प्रदेशात तब्बल 38 दिवस चाललेल्या अमेरिका -इराण युद्धाला दोन आठवड्यांचा युद्धविराम मिळाल्याच्या बातमीनंतर सारं जग खुश झालं होतं. या नुसत्या युद्धविरामाच्या बातमीनं सोन्या-चांदीचे भाव वधारले होते, तर शेअर बाजारानं देखील उसळी घेतली होती. आता तुम्हा सर्वांना हा प्रश्न पडला असेल की ही चर्चा का फिस्कटली? तर झालं असं, इराणनं शरणगती पत्करावी ही अमेरिकेची अट इराणकडून अमान्य करण्यात आली. युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवण्याची अमेरिकेची मागणी इराणकडून अमान्य केल्याने ही चर्चा फिस्कटली.
होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याच्या मुद्यांवर असहमती
इराणनं सुमारे 900 पौंड युरेनियमचा साठा काढून टाकावा ही अमेरिकेची अट इराणकडून अमान्य. अण्वस्त्र कार्यक्रम आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं या मुद्यांवर असहमती. निर्बंध हटवण्यासंबंधी अमेरिका अनुकूल पण युद्ध भरपाई, आखाती युद्ध पूर्ण थांबवण्यावर असहमती. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांच्या म्हणण्यानुसार, इराण अण्वस्त्र बनवणार नाही याची हमी देत नव्हतं. इराणचे नेते म्हणतात, अमेरिका जरा जास्तच अटी टाकतेय आणि बेकायदा विनंती करतेय.
युद्ध पुन्हा सुरू होण्याचा मोठा धोका
इराण-अमेरिकेची चर्चा निष्फळ ठरल्यानतंर सध्या परिस्थिती पूर्णपणे अनिश्चित आहे. एकीकडं अमेरिका ‘अंतिम प्रस्तावा’बद्दल बोलतेय, तर दुसरीकडं इराण मात्र आपला ‘हक्क’ सोडायला तयार नाही. अशा परिस्थितीत, एकतर इराण अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारेल किंवा दोन्ही देश नव्यानं वाटाघाटी सुरू करतील पण जर यापैकी काहीही झालं नाही, तर युद्ध पुन्हा सुरू होण्याचा मोठा धोका उद्भवू शकतो.
इराण-अमेरिकेत जवळपास 21 तास चर्चा झाली, मात्र या प्रदीर्घ चर्चेनंतरही दोन्ही देश कोणत्याही करारावर पोहोचू शकले नाहीत. ही चर्चा फिस्कटल्यानं केवळ शांतता प्रक्रियेलाच धक्का बसला नाही, तर संपूर्ण मध्य-पूर्वेतील तणाव पुन्हा वाढण्याचा धोका निर्माण झालाय. त्यामुळं पुन्हा एकदा या युद्धाचा दुसरा अंक सुरू होण्याच्या भीतीनं सारं जग चिंतेच्या गर्तेत सापडलंय.










