पाइपलाइन प्रकल्पाचे काम सुरु असताना मातीचा प्रचंड ढिगारा अचानक कोसळला आणि एका बिचाऱ्या कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना घडली आहे पुण्यातील पाटील इस्टेट परिसरात, जिथे ‘जायका’च्या पाइपलाइन प्रकल्पांतर्गत काम सुरु होतं. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही धक्कादायक दुर्घटना घडली. मातीचा ढिगारा कोसळल्यानं एक कामगार मातीखाली गाडला गेला आणि त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ‘फायर ब्रिगेड’, ‘रेस्क्यू टीम्स’ आणि ‘एनडीआरएफ’च्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत त्या कामगाराला बाहेर काढले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, काम सुरू करताना सुरक्षिततेचे नियम पाळले गेले होते का, यावर प्रश्न उपस्थित होतो आहे. याप्रकरणी प्रशासनाकडून चौकशीचं आदेश देण्यात आले आहेत.












