जैन ट्रस्ट जमीन घोटाळा प्रकरणात आक्रमक भूमिका मांडलेल्या रविंद्र धंगेकर यांनी पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात आता उडी मारली आहे. “पुण्यातील कोरेगाव पार्क येथ झालेल्या जागेच्या व्यवहाराबद्दल माहिती समजली. निश्चितच पुणे शहरात झालेल्या या मोठ्या गैरव्यवहारातील अनियमितता तपासून ह्या जागेबाबत देखील पुणेकरांच्या वतीने मोठा लढा आपण उभा करू. कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारच्या घोटाळ्यांना पायबंद घातला गेला पाहिजे, मग त्यामागे कितीही मोठी राजकीय शक्ती असली तरीही…”, अस म्हणत रविंद्र धंगेकर यांनी एकप्रकारे अजितदादांना आव्हानच दिलं आहे.
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं 40 हेक्टर जागेच्या खरेदीविरोदात सह जिल्हा निंबधक क वर्ग 1 यांनी बावधन पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यापाठोपाठ कृषी विभागाची 5 एकर जमीन घोटाळा समोर आला. या सर्व प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनी आणि त्यातील सहभागीदारांची नावं समोर आली आहेत. अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांचा 99 टक्के वाटा आहे. 1 टक्के वाटा असलेले दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर शीतल तेजवानीसह इतर आरोपींवरही कार्यवाही करण्यात आलेली आहे. शीतल फरार झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करा
पार्थ पवार यांच्या कंपनीकडून झालेल्या जमीन गैर व्यवहार प्रकरणात गेल्या दोन दिवसांपासून वातावरण तापलं आहे. उद्धव सेना, काँग्रेसने याप्रकरणात चौकशीची आणि अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. तर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा आता या प्रकरणात उडी घेतली आहे.
गुन्हा दाखल झालाय मात्र पार्थ पवारांना का ठेवलंय
कोंढवा जमीन व्यवहारात सगळी सिस्टीम चुकली आहे, गुन्हा दाखल झालाय मात्र पार्थ पवारांना का ठेवलंय हे कळलं नाही. जैन बोर्डिंग आणि हा जमीन व्यवहार दोन्ही कांड आहेत .या व्यवहारात पोलीस ऍक्शन झाली मग जैन बोर्डिंगमध्ये कां नाही, एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय असं का? असा सवाल धंगेकरांनी केला. दादाच्या मुलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
दादांचं कोणी ऐकत नाही
चुकीला माफी नाही. पार्थ पवार चुकलाय, चोरी करायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणायचं माघारी पैसे भरा. जैन बोर्डिंग आणि कोंढवा जमीन गैरव्यवहार दोन्हीची ED कडून चौकशी केली पाहिजे. वडिलांची पॉवर मुलगा वापरतो यात काहीच प्रश्न नाही. यामध्ये कडक कारवाई झाली पाहिजे. दादांचं कोण ऐकत नाही, पक्षामध्ये देखील कोण ऐकत नाही आणि मूल मोठी झालीत ती देखील ऐकत नाहीत, असा टोलाही धंगेकरांनी अजितदादांना लगावला. धर्मादाय आयुक्तांवर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
संघाच्या मुशीत तयार झालेल्या नेत्याने भ्रष्टाचाराला राजश्रय दिला
अजित पवार म्हणतात की व्यवहार झालाच नाही. असं असेल तर मग तो रद्द करण्याची वेळ कशी आली.. अजित दादांचे या विषयाचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’ आहेत… इतर वेळी मुद्देसूद विषय मांडणारे, नियमांवर बोट ठेवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही ‘बेसंबंध‘ वाक्य सहनही होतात. एका अर्थाने संघाच्या मुशीत तयार झालेल्या नेत्याने भ्रष्टाचाराला दिलेला हा राजश्रय म्हणावा लागेल, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.



