नागपूर
पक्ष्याच्या धडकेमुळं एअर इंडियाच्या विमानाचं नुकसान झालं. मात्र कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळं मोठी दुर्घटना टळली. 24 ऑक्टोबर रोजी हे विमान नागपूरहून दिल्लीला जात होतं. नागपूरहून उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाच्या विमानाला पक्ष्यानं धडक दिली. कर्मचाऱ्यांनी परतण्याचा निर्णय घेतला. काही वेळातच विमान नागपूर विमानतळावर परत उतरलं आणि सुरक्षा तपासणी करण्यात आली. तपासणीत पक्ष्यांच्या धडकेमुळंच विमानात बिघाड झाल्याचे आढळून आलं. त्यानंतर उड्डाण रद्द करण्यात आलं. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळं मोठी दुर्घटना टळली. जर नागपूरमध्ये त्वरित लँडिंग केलं नसतं तर विमान दिल्लीला जाताना अपघातग्रस्त झालं असते.
एअर इंडियाचा प्रवक्ता काय म्हणाला
एअर इंडियाच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, “उड्डाणानंतर लगेचच विमान AI466 ला एका पक्ष्यानं धडक दिली. मानक कार्यपद्धतीनुसार, खबरदारी म्हणून, क्रूनं विमान तपासणीसाठी नागपूरला परतण्याचा निर्णय घेतला. विमान नागपुरात सुरक्षितपणे उतरलं आणि देखभाल तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये दुरुस्तीसाठी अतिरिक्त वेळ लागला. यामुळं, उड्डाण रद्द करण्यात आलं. नागपुरातील आमच्या ग्राउंड टीमनं प्रवाशांना जेवण देण्यासह तात्काळ मदत केली.”
एका महिन्यातील दुसरी घटना
या विमानात सुमारे 150 प्रवासी होते आणि त्यांचं भाडे परत करण्यात आलं आहे. पक्ष्यांचं निरीक्षण करण्यासाठी विमानतळावर चोवीस तास कर्मचारी तैनात असतात. मात्र रात्री पक्षी दिसत नाहीत. त्यामुळं, घुबड किंवा वटवाघूळ विमानाला धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका सूत्रानं सांगितलं की, दिवाळीच्या वेळी, फटाक्यांच्या आवाजानं पक्ष्यांना विमानतळावरुन हाकलून लावलं जाते. अलिकडच्या काळात नागपुरात पक्ष्यांच्या धडकेची ही दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यात, एअर इंडियाच्या विमानाला पक्षी धडकला, ज्यामुळं त्याच्या नाकाच्या शंकूला नुकसान झालं. या घटनेनंतर, धावपट्टीवर गरुडाचा मृतदेह आढळला होता.





