डॉ. बाबा आढाव : सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी लढा उभारा पुणे : प्रतिनिधी कामगार चळवळीत आलेली मरगळ दूर करावी लागेल. नवं काहीतरी करण्यासाठी इतिहासात झालेल्या चुका सुधारण्यासाठी एकजुटीने एकत्र आले पाहिजे. नुसता कायदा करू किंवा मंडळ स्थापन करून उपयोगाचे नाही, त्यासाठी सरकारने घरेलु कामगारांसाठी बजेटमध्ये तरतूद करायला हवी. सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी लढा उभारा, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी केले. श्रमिक भवनमध्ये कष्टकरी जनतेच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या मसुद्यावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. सर्व श्रमिक संघटनेचे अध्यक्ष कॉ. उदय भट, घरेलू कामगार मोलकरीण संघटनेच्या शारदा वाडेकर, पुणे शहर मोलकरणी संघटनेच्या कॉ. मेधा थत्ते, कष्टकरी संघर्ष महासंघाचे काशिनाथ नखाते, कामगार एकता युनियनचे राजू वंजारे, ॲड. झाकीर आत्तार, आनंद-आधार घरेलू संघटनेच्या अनिता गोरे, विद्यापीठ निर्माण कृती समितीचे अध्यक्ष डॉ. गौतम बेंगाळे, संजीवनी कदम, आजीविका ब्युरो संस्थेचे संदीप आणि स्वाती, श्रीवणीच्या मृणालताई, होप संघटनाच्या मायाताई, धनाजी कांबळे, संपत मोरे, कागद काच पत्रा संघटनेच्या शैलेजा आरळकर यांनी या चर्चासत्रामध्ये भाग घेतला. युवा संस्थेचे व जनता जागृती मंचाचे नितीन कबुल, कष्टकरी संघर्ष महासंघाचे उपाध्यक्ष राजेश माने, युवराज भाऊ, लाल निशाण पक्षाचे पुणे महानगरपालिका कामगार संघटनेचे सिद्धार्थ प्रभुणे यांच्यासह विविध संस्था संघटनांच्या प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला. महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार संघटना व राष्ट्रीय घरकामगार संघटना यांचे सभासद आणि प्रमुख महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. चर्चासत्रामध्ये कॉ. ज्ञानेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. संग्राम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. आनंदा कांबळे यांनी आभार मानले.












