Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानमध्ये विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक अदाकारीतून परंपरा, संस्कृतीचे दर्शन
महाराष्ट्र

धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानमध्ये विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक अदाकारीतून परंपरा, संस्कृतीचे दर्शन

सांस्कृतिक कला महोत्सवात कलागुणांचे, सृजनशीलतेचे मनोहारी सादरीकरण पुणे : प्रतिनिधी मनोहारी गणेश वंदना, आदिशक्तीचा जागर… कर्णमधुर गीतांचे व पोवाड्यांचे गायन… प्रबोधनपर नाटिकांचे सादरीकरण… भारुडांतून अंधश्रद्धा निर्मूलन… वारकरी वेशात हरिनामाचा गजर अन देशभक्तीपर गीतांचा गहिवर… नेत्रदीपक नृत्याविष्कार… विद्यार्थ्यांतील कलागुणांचे, सृजनशीलतेचे मनमोहक सादरीकरण पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा केलेला कडकडाट अन भरभरून कौतुक! निमित्त होते, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्थेत आयोजित सांस्कृतिक कला महोत्सव सप्ताहाचे! सलग सात दिवस धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान शैक्षिणक संकुलात वार्षिक सांस्कृतिक कला महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. संस्थेच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी आपापली कला या महोत्सवात सादर केली. विविध कला, परंपरा व सृजनशीलतेचे दर्शन घडवणारा हा महोत्सव पाहण्यासाठी विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती .

विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, आदिशक्तीचा जागर, कोळी नृत्य, कव्वाली, पाणी अडवा पाणी जिरवा, मिशन मंगलम, खंडोबाचा जागर, महाराष्ट्राची संतपरंपरा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग व पोवाडे आणि विविध नाटिकांच्या माध्यमातून सादरीकरण केले. मोबाईल पाहण्याचे दुष्परिणाम आणि खेळाचे फायदे यावर भाष्य करणारी नाटिका, विविध ऐतिहासिक प्रसंगावर गीतांच्या माध्यमातून केलेले भाष्य, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिरकणी यांच्या इतिहासाची महती पटवून देणारे प्रसंग सादर केले. देशभक्तीपर गीतांतून ‘जय जवान, जय किसान’चा नारा दिला. भारतरत्न स्वर्गीय रतन टाटा यांनाही गीतांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .



या सांस्कृतिक महोत्सवासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लाऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, शिक्षण विभागाच्या सुवर्णाताई फणसे, प्रशांत नेटवटे, संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब बंडोजी चव्हाण, पदाधिकारी नंदूशेठ बंडोजी चव्हाण, भीमराव बंडोजी चव्हाण, सचिव सुधाकरराव जाधवर, संचालक अनिकेत काकासाहेब चव्हाण, संचालिका सुनिता काकासाहेब चव्हाण, हर्षदा अनिकेत चव्हाण, रवीना अवधूत चव्हाण यांच्यासह धायरी व परिसरातील सर्व मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाचे नियोजन विविध शाखांचे मुख्याध्यापक विकास कुंभार, विलास खाडे, माधव काकडे, डॉ. सुनीता चव्हाण, दीपक खेडकर, वंदना काकडे, मदन सूर्यवंशी यांनी सर्व शिक्षकांच्या सहकार्याने केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी अतिशय मोलाचे योगदान दिले .

याबाबत धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान अध्यक्ष काकासाहेब चव्हाण यांनी सांगितले की, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान गेली २५ वर्षे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे. आपल्या विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा सांस्कृतिक महोत्सव आयोजिला जातो. त्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यांच्यात नवी ऊर्जा निर्माण होते. विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या एकत्रित मेहनतीमुळे यंदाचा महोत्सव अतिशय दर्जेदार झाला आहे. .

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts