जालना : पोलीस पाटील भरती 2025 करीता पार पडलेल्या परीक्षा केंद्राना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट देवून, परीक्षा पारदर्शक व्हावी आणि गैरप्रकार होऊ नये याची पाहणी करून, परीक्षा सुरळीत पार पडेल याची खात्री केली. तसेच परीक्षेच्या तयारीचा आणि व्यवस्थेचा देखील यावेळी आढावा घेतला.
जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील संवर्गाची पदभरतीसाठी जिल्ह्यातील जालना उपविभाग 185, भोकरदन उपविभाग 242, अंबड उपविभाग 251 आणि परतूर उपविभाग 204 असे एकूण 724 रिक्त पदासाठी आज एकुण 24 परिक्षा केंद्रावर लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पार पडलेल्या पोलीस पाटील भरती परीक्षेला 7843 परिक्षार्थींनी परीक्षा दिली. जिल्हाधिकारी मित्तल यांनी येथील अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना आणि डॉ. बद्रीनारायण बारवाले, महाविद्यालय, जालना या परिक्षा केंद्रास प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली.
पोलीस पाटील भरती 2025 ही अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक व कार्यक्षम पद्धतीने यशस्वीरित्या पार पडावी याकरीता सर्व परिक्षा केंद्रावर बैठे पथक व भरारी पथक यांची नियुक्त करण्यात आले होते. या भरती प्रक्रियेमध्ये सर्व संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, कर्मचारी, पोलीस यंत्रणा व तांत्रिक पथक यांनी उत्कृष्ट समन्वय व कार्यक्षमता दाखवत उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यामुळे सर्व परिक्षा केंद्रावर शांततापुर्ण वातावरणात परिक्षा पार पडली. कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.