सातारा : पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसर मध्यरात्री 12 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. या भूकंपाची तीव्रता 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. केंद्रबिंदू कोयना धरणापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर होता. धक्का सौम्य स्वरूपाचा असल्यानं कोयनानगर वगळता इतर भागांत जाणवला नाही. दरम्यान, भूकंपामुळे धरणाला कोणताही धोका नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनानं दिली आहे.
कोयना धरण सुरक्षित
कोयना धरण परिसराला मध्यरात्री भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 3.4 रिश्टर स्केल इतकी होती. कोयनानगर वगळता इतर भागांत हा भूकंप जाणवला नाही. केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येला 3 किलोमीटर अंतरावर होता.भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका झालेला नाही. तसेच पाटण तालुक्यात कुठेही पडझड झाली नसल्याची माहिती सातारा जिल्हा प्रशासन आणि धरण व्यवस्थापनानं दिली आहे.
ऐन स्वातंत्र्यदिनीही कोयना धरण परिसरात भूकंप
यापूर्वी कोयना धरण परिसरात ऐन स्वातंत्र्यदिनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला होता. 15 ऑगस्ट रोजी दुपारी 2:45 च्या सुमारास झालेल्या या भूकंपाची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू धरणापासून सुमारे 41 किलोमीटर अंतरावर होता. तो वारणा खोऱ्यातील तानमळा गावाच्या पूर्वेला 10 किलोमीटर आणि चिपळूणच्या दक्षिणेला 11 किलोमीटर अंतरावर होता.
धरण परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के
पाटण तालुका भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील कोयना धरण परिसरात सातत्याने लहान-मोठे भूकंपाचे धक्के जाणवतात. 2025 या वर्षात 5 जानेवारी रोजी 2.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला भूकंप झाला होता. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी 2.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा भूकंप नोंदवण्यात आला. सतत होणाऱ्या भूकंपांचा परिणाम काय होतो, याचा अभ्यास करण्यासाठी कोयना धरणावर विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे.
कोयना धरणाची सुरक्षा होणार अधिक बळकट
नवीन यंत्रणेच्या माध्यमातून भूकंपाचा सखोल अभ्यास करण्यात येणार असून, त्यातून कोयना धरणाची सुरक्षा अधिक बळकट होणार आहे. धरणाच्या तळाशी, मध्यभागी आणि वरील भागात ही उपकरणे बसविण्यात येणार आहेत. यामुळे भूगर्भातील हालचालींवर होणाऱ्या परिणामांचा बारकाईनं अभ्यास करता येईल.