Ladki Bahin Yojana new rules: विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस मतं मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेतील घोटाळे समोर आले आल्यानंतर बोगस लाभार्थी शोधून काढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर मोहीम राबवली जात आहे. कारण, लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर प्रचंड मोठा आर्थिक भार पडत आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात मतांच्या बेगमीसाठी राज्य सरकारने या योजनेसाठीचे निकष काटेकोरपणे पाळले जात आहेत की नाही, याकडे फार लक्ष दिले नव्हते. मात्र, आता लाडकी बहीण योजनेचा आर्थिक भार सोसेनासा झाल्यानंतर राज्य सरकारने प्रत्येक निकषाची कठोर अंमलबजावणी करुन लाखो बोगस लाभार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यानंतर, आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे. या योजनेतील लाभार्थ्यांच्या सोबतच संबंधित महिलेने पती किंवा वडिलांची ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पती किंवा वडिलांचं E-KYC गरजेचं
लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थीसोबतच त्या महिलेचे पती किंवा वडिलांचेही वार्षिक उत्पन्न किती आहे, याचीही आता राज्य सरकारकडून पडताळणी केली जाणार आहे. जर महिलेचे लग्नं झाले असेल तर पतीचं आणि लग्न झाल नसेल तर वडिलांचे उत्पन्न शोधले जाणार आहे. लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास संबंधित महिलेला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल. लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावं, अशी मुख्य अट आहे. अनेक पात्र महिलांचे उत्पन्न कमी आहे. याआधी लाभार्थी महिलांचे उत्पन्न शोधण्यात आले होते, त्यात गृहिणी आणि बहुतांश महिलांचे उत्पन्न अडीच लाखांच्या वर नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळे, आता राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न शोधण्यासाठी पती किंवा वडिलांची ई केवायसी बंधनकारक केले आहे.
E-KYC कस करायचं?
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची?
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e-KYC फॉर्म उघडेल.
या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.
यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही?
* जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
* जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही?, हे तपासले जाईल.
जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल. यानंतर लाभार्थी महिलेच्या पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. नंतर Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईल क्रमांकावर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.
त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:
1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
2. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.
शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे”, असा संदेश दिसेल.