नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी गुजरातमधील भावनगर येथील जवाहर मैदानावर आयोजित एका भव्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमधील विकास प्रकल्पांचं उद्घाटन तसंच भूमीपूजन करणार आहेत. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘समुद्र से समृद्धी’ कार्यक्रमात सहभागी होतील अन् 34200 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करतील. सागरी क्षेत्र हा या कार्यक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू आहे, जिथं पंतप्रधान मोदी 7870 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन करतील.
नवीन कंटेनर टर्मिनलची पायाभरणी :
या उपक्रमांमध्ये प्रमुख भारतीय बंदरांवर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचं अपग्रेडेशन समाविष्ट आहे. यामध्ये इंदिरा डॉक येथील मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचं उद्घाटन आणि कोलकाता येथील श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरात नवीन कंटेनर टर्मिनलची पायाभरणी करण्यात येणार आहे. अतिरिक्त सागरी विकासकामांमध्ये पारादीप बंदर (ओडिशा) इथं एक नवीन कार्गो बर्थ आणि कंटेनर हाताळणी सुविधा समाविष्ट आहे. तसंच गुजरातमध्ये टुना टेकरा मल्टी-कार्गो टर्मिनल आणि कामराजर बंदर (एनोर, तामिळनाडू), चेन्नई बंदर, कार निकोबार बेट, दीनदयाळ बंदर (कांडला) इथं आधुनिकीकरण प्रकल्प आणि पाटणा आणि वाराणसीमधील अंतर्गत जलमार्ग सुविधांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांसाठी 475 मेगावॅट पीएम-कुसुम सोलर फीडर :
पंतप्रधान केवळ गुजरातमध्ये 26354 कोटी किमतीच्या प्रकल्पांच्या मोठ्या पोर्टफोलिओचं अनावरण करतील, ज्यात अक्षय ऊर्जा, बंदर, पायाभूत सुविधा, रस्ते, आरोग्यसेवा आणि शहरी वाहतूक यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. उद्घाटन होणाऱ्या प्रमुख उपक्रमांमध्ये छारा बंदरातील एचपीएलएनजी रीगॅसिफिकेशन टर्मिनल, गुजरात आयओसीएल रिफायनरीमधील अॅक्रेलिक आणि ऑक्सो अल्कोहोल प्रकल्प, 600 मेगावॅट ग्रीन शू इनिशिएटिव्ह आणि शेतकऱ्यांसाठी 475 मेगावॅट पीएम-कुसुम सोलर फीडर यांचा समावेश आहे. बडेली 45 मेगावॅट सोलर पीव्ही प्रकल्प आणि धोर्दो गावाचं संपूर्ण सौरीकरण देखील उद्घाटन केलं जाणार आहे. आरोग्यसेवा आणि शहरी पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात भावनगरमधील सर टी. जनरल हॉस्पिटल आणि जामनगरमधील गुरु गोविंद सिंह सरकारी हॉस्पिटलच्या विस्तारासाठी पायाभरणी केली जाणार आहे.
राज्यातील कनेक्टिव्हिटी आणि व्यापारी मार्ग सुधारतील :
पंतप्रधान मोदी 70 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरणाच्या प्रकल्पाचा शुभारंभ देखील करतील. यामुळं राज्यातील कनेक्टिव्हिटी आणि व्यापारी मार्ग सुधारतील. सरकारी संस्था आणि खासगी कंपन्यांमध्ये अनेक सामंजस्य करार केले जातील, सार्वजनिक-खासगी भागीदारी मजबूत होईल आणि प्रादेशिक विकासाला गती मिळेल. शाश्वत औद्योगिकीकरण, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि जागतिक गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करणारं ग्रीनफील्ड औद्योगिक शहर म्हणून कल्पना केलेल्या धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्राचे पंतप्रधान हवाई सर्वेक्षणदेखील करतील.