Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • नवरात्री 2025 : स्त्रीशक्तीचा जागर; साडेतीन शक्तिपीठांची विशेष कहाणी
धार्मिक

नवरात्री 2025 : स्त्रीशक्तीचा जागर; साडेतीन शक्तिपीठांची विशेष कहाणी

सध्या देशभरात शारदीय नवरात्रौउत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. नवरात्र उत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचा सण. देशासह राष्ट्रात स्त्रीशक्तीला अनन्यसाधारण महत्व असून भक्ती भावाने देवीला पुजले जाते. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक देव देवता संत महात्म्यांची मंदिर आहेत. आणि मनोभावे भक्तगण त्यांची पूजा करतात. याच प्रमाणे महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठ देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असून मनोभावे त्यांची प्रार्थना केली जाते.

साडेतीन शक्तीपीठ आणि त्यांचे धार्मिक महत्त्व

महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तिपीठे आहेत, ज्यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी आणि माहूरची रेणुका ही तीन पूर्ण पीठे आहेत, तर नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी देवी हे अर्धे पीठ मानले जाते. या पीठांना आदिशक्तीची पवित्र स्थळे मानली जातात. या शक्तीपीठांच्या दर्शनाने भक्तांना शांती आणि दैवी शक्तीशी संबंध जोडता येतो. प्रत्येक शक्तिपीठाच्या निर्मितीची एक खास आख्यायिका आहे, जी या स्थळांना आणखी पवित्र बनवते. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी देवी महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ आहे.

साडेतीन शक्तीपीठ म्हणजे काय?

महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. साडेतीन शक्तिपीठे म्हणजे ॐ काराचे सगुण रूप आहे. ॐ कारामध्ये सार्धत्रय (साडेतीन) मात्रा आहेत. ‘अ’कार पीठ माहूर ‘उ’कार पीठ तुळजापूर ‘म’कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी. सप्तश्रुंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून अर्धपीठ. आदिशक्तीचे स्वरूप अत्यंत विराट आणि विश्वाकार आहे. आदिशक्ती नाना प्रकारच्या प्रतिकांतून प्रकट होते. आदिशक्तीची काश्मीर, कांची व कामाख्या अशी तीन पीठे असून त्यांना शक्तिपूजेची तीन मुख्य केंद्रे मानली जातात. या प्रमुख तीन पीठांचा वा शक्तिकेंद्रांचा ज्यात समावेश केला जातो, अशी एकूण ५१ शक्तिपीठे भारतात आहेत. तर या नवरात्रोत्सवानिमित्ताने महाराष्ट्रातील साडेतीन शक्तींपीठांचे धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व, मान्यता, पौराणिक कथा यांविषयी या लेखातून जाणून घ्या…

कोल्हापूर महालक्ष्मी

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी व महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नसले तरी हे देवालय शिलाहारापूर्वी करहारक (कर्‍हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे, असे काही संशोधक म्हणतात. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सिम भक्त होते. आपणास देवीचा वरप्रसाद मिळाल्याचे त्यांनी अनेक लेखांत लिहून ठेवले आहे. सातव्या शतकात चालुक्य राजवटीत राजा कर्णदेव याने हे देवालय बांधल्याचा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो. श्री महालक्ष्मीची मूर्ती दगडी चौथर्‍यावर उभी करण्यात आलेली आहे. मंदिरात घाटी दरवाजा, गरूड मंडप अशी सुंदर नक्षीकाम केलेली ठिकाणे आहेत. गरूड मंडप, सभा मंडप १८४४ ते १८६७ च्या दरम्यान बांधण्यात आला. अश्र्विन नवरात्रात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथर्‍यावर ठेवून तिची पूजा केली जाते.

​माहूर रेणुकादेवी

माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. रेणुकादेवी तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांचीदेखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत. साडेतीन शक्तिपीठांपैकी हे एक मूळ जागृत पीठ होय. परशुरामांची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता असून देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे, असे म्हटले जाते. माहूरच्या गडापासून जवळच ‘रामगड’ हा किल्ला असून, काही कोरीव कामे केलेल्या गुहा आहेत. हे स्थान नांदेड जिल्ह्यात, माहूर तालुक्यात आहे. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला देवीची पूजा होते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले, म्हणून याला ‘मातापूर’ म्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात ‘ऊर’ म्हणजे गाव ते ‘ माऊर ‘ आणि पुढे ‘ माहूर ‘ झाले.

तुळजापूर तुळजाभवानी

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. क्षात्रतेज’ या शब्दाचा अर्थ शौर्य, पराक्रम किंवा क्षत्रियतेजाचे प्रतीक असा होतो. तुजभवानी मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या मते हे १७ व्या किंवा १८ व्या शतकातील मंदिर आहे. संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात. मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, श्री भवानी शंकर मंदिर, होमकुंड, प्रांगणातील देवीदेवता, मातंगी मंदिर इ. धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत. नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र, हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो.

​सप्तशृंगी देवी

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तश्रृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे. या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते. श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर आहेत. या शक्तिपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक, साक्षात ब्रम्ह स्वरूपिणी धर्मपीठ, ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजे सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगी देवी होय. सप्तशृंगीदेवीबरोबरच गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा आदी महत्त्वाची, पवित्र तीर्थस्थळे आहेत.

अशी हि महाराष्ट्रातील आराध्य असणारी साडेतीन शक्तीपीठ अत्यंत जागृत मानली जातात. तसेच अनेक भाविक आपल्या मनातील इच्छा, दुःख, आनंद, भाव देवीच्या चरणी येऊन मांडतात.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts