अश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीपासून नवरात्र महोत्सव सुरू होतो. यंदा सोमवार, 22 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर या कालावधीत सन 2025 मधील नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. तर 02 ऑक्टोबर 2025 रोजी दसरा (विजयादशमी) ला सांगता होईल. नवरात्रात नवदुर्गेच्या नऊरुपांचे पूजन, आराधना, उपासना केली जाते. देवीच्या पूजेची, आराधनेची परंपरा प्राचीन काळापासून असून आजतागायत ती सुरू असल्याचे पाहायला मिळते. नवरात्रातील पहिली माळ आणि नवदुर्गेचे प्रथम स्वरुप शैलपुत्री देवीला समर्पित आहे. या लेखाच्या माध्यमातून शैलपुत्री देवीचे महत्त्व, महात्म्य यांविषयी जाणून घेऊया…
शैलपुत्री मातेविषयी थोडक्यात माहिती
शैलपुत्री देवीच्या ललाटावर (कपाळावर) अर्धचंद्र असून देवीच्या उजव्या हातात त्रिशुल आणि डाव्या हातात कमळाचे फुल आहे. शैलपुत्री देवीचे वाहन नंदी असल्याने शैलपुत्री देवीला वृषभारुढा असेही संबोधले जाते. हिमालय कन्येच्या रुपात जन्मलेली देवी सती पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. नवरात्रातील पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचे पूजन केल्यास चंद्र दोष नाहीसा होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पर्वतराज हिमालय यांच्या कन्या म्हणून जन्मल्याने देवीचे नाव ‘शैलपुत्री’ पडले. नवरात्र पूजनात पहिल्या दिवशी “देवी शैलपुत्री”चा पहिला मान आहे.
शैलपुत्री मातेची पूजा आणि महत्व
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा आणि उपासना केली जाते. या दिवशी योगी लोक आपल्या मनाला मूलाधार चक्रामध्ये स्थिर करतात आणि येथूनच त्यांची योगसाधना सुरू होते, असं बोललं जात. भक्तांच्या मनात शैलपुत्री देवीची पूजा केल्याने सर्व दुःखे दूर होतात, अशी मान्यता आहे.
शैलपुत्री देवीचा मंत्र
“या देवी सर्वभूतेषु शैलपुत्री रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:।”
यावेळी शैलपुत्री देवीची उपासना करताना या मंत्राचा जप केला जातो.
देवीचा नैवेद्य आणि रंग :
शैलपुत्री देवीला गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच देवीला पांढरा रंग प्रिय असल्याने देवीला पांढऱ्या रंगाची फुल अर्पण केली जातात. तसेच देवीला पांढरी वस्त्र परिधान करून अर्पण करणं शुभ मानले जाते.
कुमारिका पूजन
नवरात्र हा सण स्त्री शक्तीचा सण म्हणून देखील पूजाला जातो. यावेळी नवदुर्गांसोबतच स्त्री शक्तीची देखील पूजा केली जाते. त्यामुळे नवरात्रात विशेषतः व्रताचा संकल्प केला असल्यास संपूर्ण नऊ दिवस कुमारिका पूजन करावे. प्रत्येक दिवशी एका कुमारिकेला बोलावून मान-पान करावे. वास्तविक नवरात्रात दिवसागणिक कुमारिका पूजनाची संख्या वाढवावी, असे म्हटले जाते. मात्र, शक्य नसल्यास दररोज किमान एक तरी कुमारिकेचा मान-पान करावा, असे सांगितले जाते.