नवरात्रीच्या नवदुर्गामधील दुसरे रूप म्हणजे माता ब्रह्मचारिणी. ब्रह्मचारिणीचा अर्थ असा होतो कि ‘ब्रह्म’ म्हणजे तपस्या आणि ‘चारिणी’ म्हणजे आचरण करणारी, त्यामुळे कठोर तपस्या करणाऱ्या ‘देवीला ब्रह्मचारिणी’ असे म्हटले जाते. पार्वती मातेने भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केलेल्या कठोर तपस्येमुळे तिला हे नाव मिळाले.
माता ब्रह्मचारिणीचे स्वरूप:
देवी ब्रह्मचारिणीचे रूप अत्यंत तेजस्वी आणि भव्य असून त्यांच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. तसेच असं म्हटलं जात कि, भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी केलेल्या तपस्येदरम्यान, हजारो वर्षे केवळ फळे-फुले खाऊन आणि नंतर अनेक वर्षे केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्री खाऊन ती राहिली. पुढे तिने बेलपत्री खाणेही सोडले, म्हणून तिला ‘अपर्णा’ असेही म्हणतात.
पूजेचे महत्त्व:
असं म्हटलं जात कि, ब्रह्मचारिणी मातेची पूजा केल्याने भक्ताला तप, त्याग, वैराग्य आणि संयम प्राप्त होतो. तसेच या देवीच्या कृपेने कठीण परिस्थितीतही संयम राखण्याची शक्ती मिळते. या देवीची पूजा केल्याने व्यक्तीमध्ये ज्ञान आणि वैराग्य वाढते, असं मानलं जात.
पूजा विधी:
ब्रह्मचारिणी मातेला नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजेचा मान आहे. या पूजे दरम्यान फुले, अक्षता, चंदन आणि कुंकू अर्पण केले जाते. तसेच नवरात्रीच्या पूजेच्या वेळी दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने अभिषेक घातला जातो. तसेच दूध आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. पूजेनंतर ब्रह्मचारिणी देवीच्या मंत्राचा जप करून आरती केली जाते.
मंत्र:
‘दधाना करपद्माभ्याम अक्षमाला कमण्डलू। देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा।।’
हा मंत्र देवी ब्रह्मचारिणीच्या उपासनेच्या वेळी जपला जातो.