नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पारंपरिक विजयादशमी उत्सव आज (२ ऑक्टोबर) रेशीमबाग मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी ७.४० वाजता सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर पारंपरिक गणवेशातील स्वयंसेवकांच्या भव्य पथसंचलनाला सुरुवात झाली. संचलनानंतर सामूहिक गीतं सादर करण्यात आली. याचबरोबर मोहन भागवत यांच्या हस्ते शस्ञपूजनही पार पडले. या सोहळ्यास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय ठरली. कित्येक काळानंतर गडकरी आणि फडणवीस यांची गणवेशातील उपस्थिती लक्षवेधी ठरली.
आंतरराष्ट्रीय उपस्थिती व शताब्दी वर्षाचा संकल्प :
यंदाच्या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे परदेशातूनही काही पाहुण्यांची उपस्थिती होती. घाना, दक्षिण आफ्रिका, थायलंड, इंग्लंड आणि अमेरिकेतून आलेल्या नागरिकांनी या उत्सवाला हजेरी लावली. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात हिंदू संमेलनांचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केली.
भारतीय संस्कृतीचं महत्व :
भागवतांचा संदेश : आपल्या भाषणात डॉ. मोहन भागवत यांनी भारतीय संस्कृतीचं महत्त्व अधोरेखित केलं. ते म्हणाले, “आपली संस्कृती सर्वसमावेशक आहे. ती सगळ्यांचा सन्मान करते, स्वीकार करते. हीच आपली हिंदू राष्ट्रीयता आहे. कुणाला हिंदू शब्दावर आक्षेप असेल तर त्यांनी ‘हिंदवी’ किंवा ‘भारतीय’ म्हणावं. पण राष्ट्रत्वाचं स्पष्ट स्वरूप व्यक्त करणारा शब्द ‘हिंदू’ हाच आहे.”
ते पुढे म्हणाले की, राज्यं बदलतात, पण राष्ट्र संस्कृतीवर उभं असतं. हिंदू समाजाचं बळकट होणं, एकत्र राहणं हे देशाच्या विकासाची हमी आहे. “वसुधैव कुटुंबकमची विचारधारा हीच जगाला योग्य दिशा देऊ शकते,” असंही ते म्हणाले.
एकतेवर भर, भेदभावाविरोधात इशारा :
भागवतांनी समाजात वाढत्या फूटपाटांवर चिंता व्यक्त केली. “आपला देश विविधतेचा आहे. भाषा, पंथ, चालीरीती वेगळ्या असल्या तरी आपण सगळे एकच आहोत. लहानसहान गोष्टींवर कायदा हातात घेणं, गुंडगिरी करणं योग्य नाही. समाजाने संयम राखायला हवा आणि शासनाने भेदभावाशिवाय नियम पाळायला हवेत,” असा त्यांनी इशारा दिला.
समाज परिवर्तनातून देश परिवर्तन :
सरसंघचालकांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना संघाच्या कार्यपद्धतीवर भर दिला. ते म्हणाले, “व्यवस्था माणसांवर अवलंबून असते. समाजात परिवर्तन झालं तर व्यवस्थेत बदल होतो. प्रबोधन पुरेसं नाही, उदाहरणातून नेतृत्व घडवावं लागतं. व्यक्ती परिवर्तनातून समाज परिवर्तन आणि समाज परिवर्तनातून देश परिवर्तन हा संघाचा मार्ग आहे.” यंदाचा विजयादशमी उत्सव संघाच्या शताब्दी वर्षाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरला असून, डॉ. मोहन भागवत यांच्या संदेशातून एकता, सद्भावना आणि भारतीय संस्कृतीच्या जागतिक महत्त्वाचा ठसा उमटला.