मुंबई येथील गोवंडी परिसरात १३ वर्षीय विद्यार्थिनीवर लैगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. एका क्रिकेट प्रशिक्षकानेच रेस्ट रुममध्ये तरुणीवर अत्याचार केला आहे. याप्रकरणी देवनार पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला ५ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. हे क्रीडांगण मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित येते. अत्याचार झालेली तरुणी हि घाटकोपर येथील असून काही महिन्यांपासून ती क्रिकेट प्रशिक्षणासाठी गोवंडीला जात होती. ती रेस्ट रूम मध्ये आराम करण्यासाठी गेली असता हा संपूर्ण प्रकार घडला. हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर आरोपीने पिडीतेस घडलेला प्रकार कोणालाही न सांगण्याची धमकी दिली होती. परंतु घरच्यांना तिच्या वागणुकीत बदल जाणवू लागल्याने त्यांचा संशय बळावला. त्यानंतर पिडीतेने घडलेला संपूर्ण प्रकार आई वडिलांना सांगितला.












