Mumbai Gas Shortage | अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे (War) अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये भारत देशालाही मोठा धक्का बसला आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे भारतात गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. यामध्ये आता महाराष्ट्रातील मुंबई (Mumbai) शहरात गॅसच्या तुटवड्यामुळे (Gas Shortage) हॉटेल व्यावसायिंकावर हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे.
मुंबईत 50 टक्के हॉटेल्स बंद होणार?
हॉटेल संघटना ‘आहार’ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहेत. गॅसच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ही स्थिती अशीच राहिली तर येत्या काही दिवसांमध्ये 50 टक्के हॉटेल्स बंद करावी लागतील. तसेच आता मुंबईतील हॉटेल्समधील मेनूमध्ये कपात करण्यात आली आहे.
गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील अनेक हॉटेल्सनी वडापाव, भजी, डोसा यांसारख्या पदार्थांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अंधेरी, दादरसारख्या भागांमधील अनेक हॉटेल्सनी आपले मेनू कमी करण्यास सुरूवात केली आहे. आता काही दिवस लोकांना हॉटेलमध्ये मोजकेच पदार्थ खाता येणार आहेत.
मंत्रालयाचे कॅन्टीन करण्यात आले बंद
गॅसच्या तुटवड्याचा फटका हॉटेल्स, रेस्टॉरंटसह मंत्रालयाही बसला आहे. गॅसच्या कमतरतेमुळे मंत्रालयाचे एक कॅन्टीन बंद होणार आहे. सिलेंडर मिळत नसल्यामुळे मंत्रालयात दोन-तीन दिवस कॅन्टीन बंद ठेवण्यात येणार आहे. तर ज्या कॅन्टीनला महानगर गॅसची पाईप लाईन आहे ते कॅन्टीन फक्त सुरू राहणार असल्याची माहिची दयानंद शेट्टी यांनी दिली आहे.
दरम्यान, गॅसच्या कमतरतेमुळे केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅसला प्रथम प्राधान्य देण्याचे आदेश तेल कंपन्यांना दिले आहेत. यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. कारण राज्यात हॉटेलसाठी लागणारा 19 किलोच्या सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून हॉटेल, रेस्टॉरंट बंद होण्याच्या मार्गावर आले आहेत.
गॅस सिलिंडरच्या तुटवड्याबाबत ‘आहार’चे अध्यक्ष विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठी माहिती दिली. मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स, रेस्टॉरंट यांना मोठा फटका बसला आहे. तसेच आता 20 टक्क्यांपर्यंत आलेले हे प्रमाण आता 60 टक्क्यांवर येण्याची शक्यता असून मुंबईतील 100 टक्के हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबतचे पत्र केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. तसेच यासंदर्भात नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशीही संपर्क साधला आहे, अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली. तर काही दिवसांत मुंबईतील सर्व हॉटेल्स बंद होऊ शकतात, अशी शक्यताही वडेट्टीवारांनी वर्तवली आहे.












