मुंबई : वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील (बीकेसी) अॅपल स्टोअरवर iPhone 17 खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे. अॅपलनं नुकतीच लाँच केलेली iPhone 17 सीरीज 82,900 ते 2,29,900 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. प्री-बुकिंग केलेल्या ग्राहकांना आजपासून फोन देण्यात येत आहे, तर ऑफलाइन खरेदीसाठी स्टोअरबाहेर लांब रांगा लागलेल्या आहेत. नवीन डिझाइन, सुधारित कॅमेरा आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे ग्राहकांचा हा फोन खरेदी करण्याकडं विशेष कल आहे.
रांगा का लागल्या?
ग्राहकांपैकी एक रोहन पाटील म्हणाले, “मी गेल्या अनेक महिन्यांपासून नवीन iPhone 17 ची वाट पाहत होतो. यावेळी कॅमेरा आणि प्रोसेसरमधील सुधारणा खूप प्रभावी आहे. म्हणूनच मी आजच माझा फोन घेण्यासाठी आलो.” प्री-बुकिंग केलेल्या ग्राहकांना फोन तत्काळ मिळाले, तर काहींनी स्टोअरवर जाऊन खरेदीचा निर्णय घेतला. अॅपलने iPhone 17 सीरीजमध्ये दीर्घकाळ चालणारी बॅटरी, जलद प्रोसेसर आणि नवीन रंग पर्याय लाँच केले आहेत. याशिवाय, पर्यावरणपूरक सामग्रीचा वापर करून हे फोन तयार करण्यात आले आहेत, ज्यामुळे पर्यावरणप्रेमी ग्राहकांनाही ही सीरीज आकर्षक वाटत आहे.
देशातील पाहिलं अधिकृत स्टोअर
देशातील पहिले अधिकृत अॅपल स्टोअर मुंबईतील बीकेसीत आहे, जे गेल्या वर्षी सुरू झालं. iPhone 17 च्या लाँचदरम्यान या स्टोअरमध्ये विशेष सजावट केली गेली होती आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले. कर्मचाऱ्यांनी ग्राहकांचं स्वागत केलं आणि नवीन फोनबद्दल सविस्तर माहिती दिली. येत्या काही दिवसांत देशभरातील इतर अॅपल स्टोअर्स आणि अधिकृत विक्रेत्यांकडे ही सीरीज उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन या दोन्ही मार्गांनी iPhone 17 खरेदी करता येणार आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स : अॅपलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी EMI पर्याय, कॅशबॅक आणि जुन्या फोनच्या बदल्यात सूट यांसारख्या विविध ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यामुळे iPhone 17 खरेदीसाठी ग्राहकांमध्ये अधिक उत्साह आणि मागणी दिसून येत आहे.