कल्याणमधील शांतीदूत सोसायटीच्या पुनर्विकास मुद्यावरुन महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यावर हे प्रकरण चिघळविण्याचा आरोप केला आहे. तर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आमदार भोईर बिल्डरची वकिली करीत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र या प्रकरणामुळे शांतीदूत सोसायटीच्या रहिवासीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शांतीदूत सोसायटीचा पुनर्विकास करण्याचा प्रकल्प म्हाडाने कल्याणमधील एका बिल्डरला दिला आहे. या सोसायटीचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. या सोसायटीतील लोक अनेकांकडे न्यायासाठी खेटे मारत आहे. मात्र, त्यांना न्याय मिळत नाही. यासाठी भाजप आमदार पवार हे उद्या उपोषण करणार आहे.












