मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी मुंबईच्या लोकल ट्रेनची ओळख आहे. या लोकल ट्रेनमधून दररोज लाखो मुंबईकर प्रवास करतात. मुंबईची लोकल ट्रेन ही मुंबईकरांच्या प्रवाशांचं मुख्य साधन आहे. लोकल ट्रेनमध्ये दिवसागणिक मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळं रेल्वेने लोकल ट्रेन वाढवाव्यात, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत असताना आता लोकल ट्रेननं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईत लवकरच म्हणजे डिसेंबरअखेर पर्यंत पहिली स्वयंचलित दरवाजांची नॉन-एसी लोकल धावणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्णय
मुंबईत वाढत जाणारी लोकसंख्या आणि त्यातच रेल्वे प्रवाशीही वाढत आहेत. त्यामुळे सकाळी आणि सांयकाळी रेल्वेवर गर्दीचा ताण दिसून येतो. रेल्वे प्रवाशांच्या गर्दीमुळं प्रत्येक वर्षी रेल्वे डब्यातून पडून अनेक प्रवाशांचा मृत्यू होतो. मृत्यू होणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वयंचलित दरवाजांची नॉन-एसी लोकल यावर्षी डिसेंबरअखेर पर्यंत धावणार आहे. तसेच मुंब्रा रेल्वे स्थानक इथे झालेल्या अपघातानंतर स्वयंचलित नॉन एसी लोकलच्या निर्णयाला अधिक गती मिळाली आहे, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. शनिवारी बुलेट ट्रेनच्या घणसोली इथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे.
स्वयंचलित दरवाजांचे फायदे काय?
– रेट्रोफिटिंग तंत्रज्ञानाद्वारे गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार
– बंद-दरवाजांच्या डिझाइनच्या माध्यमातून नवीन नॉन-एसी ट्रेन तयार करणार
– गर्दीच्या वेळी बंद दरवाजे अपघात रोखू शकतात
– सध्या 12 आणि 15 डब्यांच्या गाड्या पण भविष्यात 18 डब्यांच्या लोकलवर भर देणार
– एसी लोकल ट्रेन नैसर्गिकरित्या बंद-दरवाजांच्या असतील