मुंबई : पावसाने महाराष्ट्राला झोडपले असून नद्या ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र पावसाच्या हाहाकाराने वैतागला असला तरी मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणं सध्या काठोकाठ भरली असून, धरणातील एकूण साठा 99.46 टक्के इतका झाला आहे. मागील 24 तासांत या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची नोंद झाली असून, यामुळे आगामी काळात मुंबईकरांना पाणी कपातीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सात धरणांतील साठ्याचा तपशील
मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी एकूण सात धरणं आहेत, त्यांपैकी तीन धरणं 100 टक्के क्षमतेने भरली असून उर्वरित धरणातही मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.
1. मोडकसागर: 100 टक्के
2. विहार: 100 टक्के
3. तुलसी: 100 टक्के
4. अप्पर वैतरणा: 99.58 टक्के
5. तानसा: 99.91 टक्के
6. भातसा: 99.35 टक्के
7. मध्य वैतरणा: 98.96 टक्के
एकूण साठा: 13,644 अब्ज लिटरपैकी 13,570 अब्ज लिटर (99.46 टक्के)
पावसाचा जोर आणि धरण साठ्यात वाढ
मागील काही दिवसांपासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, विशेषतः गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली. त्यामुळे साठ्यात मोठी वाढ झाली असून, सर्व धरणं ओव्हरफ्लोच्या जवळ पोहोचली आहेत. सातही धरणं जवळपास पूर्ण भरल्याने आगामी हिवाळा आणि उन्हाळा हंगाम लक्षात घेता मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट ओढावणार नाही, असे बोलले जात आहे.
मागील 24 तासात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात किती पाऊस?
1. वैतरणा – 96 मिमी
2. तानसा – 62 मिमी
3. विहार – 95 मिमी
4. तुलसी – 106 मिमी
5. अप्पर वैतरणा – 72 मिमी
6. भातसा – 58 मिमी
7. मध्य वैतरणा – 79 मिमी
मुंबई, ठाण्याला आज रेड अलर्ट
सध्या मुंबई, ठाणे, कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला असून हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या 24 तासांत या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत सध्या मुसळधार पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला असून, काही मार्गांवर रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे. मुंबई शहर व उपनगरांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरणासह हलकासा पाऊस सुरू आहे. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 3 तासांत मुंबई, ठाणे आणि परिसरातील पाच जिल्ह्यांमध्ये 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे, गडगडाटी वादळ, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.