नवी मुंबई : मुंबईकरांची दीर्घकाळची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (एनएमआयए) पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं. हे विमानतळ केवळ मुंबईचं दुसरं आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वारच नाही तर भारताच्या विमान वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये एक नवीन मैलाचा दगड ठरेल. हे अत्याधुनिक विमानतळ भविष्यात मुंबईतील गर्दी कमी करेल आणि प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा प्रदान करेल. पंतप्रधान मोदींनी मुंबई मेट्रो लाईन 3 चा शेवटचा टप्पा राष्ट्राला समर्पित केला, ज्यामुळं शहरातील प्रवास पूर्वीपेक्षा जलद, सोपा आणि अधिक सोयीस्कर झाला.
पहिल्या टप्प्याचं उद्घाटन :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यांचं आज उद्घाटन झालं आहे. या विमानतळाची उभारणी चार टप्प्यात होणार आहे. या विमानतळावरुन प्रवासी वाहतूक आणि कार्गो वाहतुकीसाठी दोन महिन्यांचा वेळ लागू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करण्यापूर्वी विमानतळाच्या कामासंदर्भातील माहिती जाणून घेतली. मोदींनी आज टर्मिनल 1 आणि रनवे 1 चं काम पूर्ण झालं, त्याचं उद्घाटन केलं. पुढच्या टप्प्यात विमानतळाचं काम कसं होणार हे देखील त्यांनी जाणून घेतलं. आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई जवळील दुसरं विमानतळ म्हणून नवी मुंबई विमानतळ ओळखलं जाईल.
विमानतळावर होणार 4 टर्मिनलची उभारणी :
नवी मुंबई विमानतळावर चार टर्मिनलची उभारणी होणार आहे. पहिल्या टर्मिनलच्या उद्घाटनाला 7 वर्षांचा कालावधी लागला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी अदानी समुह आणि सिडको यांच्याकडून संयुक्तपणे केली जात आहे. अदानी समुहाकडे या विमानतळाची सुमारे 74 टक्के मालकी आहे. तर, सिडकोकडे 26 टक्के मालकी आहे. अदानी समुहानं 2021 नं विमानतळ निर्माणामध्ये प्रवेश केला. पुढचा टप्पा दोन्ही संस्थांमार्फत होणार आहे. 2018 ला भूमिपूजन झालं त्यानंतर जमीन अधिग्रहण करुन विमानतळ उभारणं मोठं आव्हान होतं. ते काम पूर्ण झालं आहे. टर्मिनल 1 पूर्ण झाल्यानंतर आता डिसेंबर महिन्यात प्रवासी या विमानतळावरुन प्रवास करु शकतात.
जगातील सर्वात सुरक्षित विमानतळ :
नवी मुंबई विमानतळाची वास्तुकला सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लंडनस्थित प्रख्यात ‘झहा हदीद आर्किटेक्ट्स’ यांनी डिझाइन केलेला हा विमानतळ भारताचे राष्ट्रीय फूल असलेल्या कमळापासून प्रेरित आहे. ‘तरंगणारे कमळ’ ही थीम परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम दर्शवते. टर्मिनलमध्ये 12 शिल्पात्मक खांब कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे उघडताना दिसतात, तर 17 मोठे खांब या भव्य संरचनेला आधार देतात. 1 हजार 160 हेक्टरवर पसरलेल्या या प्रकल्पात पर्यावरणपूरक डिझाइन, आधुनिक लायटिंग आणि विस्तृत हॉलचा समावेश आहे. पाऊस आणि धुक्याच्या काळात सुरक्षित लँडिंगसाठी अत्याधुनिक कॅटेगरी-III इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम (ILS) बसवण्यात आली आहे, जी 300 मीटर दृश्यमानतेतही विमान उतरवू शकते. यामुळं नवी मुंबई विमानतळ जगातील सर्वात सुरक्षित आणि कार्यक्षम विमानतळांपैकी एक ठरेल.