Pune rain crop damage : “ज्या मातीला घामानं शेंदूर फासला, त्याच मातीनं आज शेतकऱ्याचा विश्वासघात केलाय! पश्चिम महाराष्ट्रात अस्मानी संकट असं काही कोसळलंय की, सुखी संसाराची राखरांगोळी झालीय. रक्ताचं पाणी करून फुलवलेलं ‘पांढरं सोनं’ आज काळवंडलंय आणि गहू चिखलात गाडला गेलाय. साहेब, तुमचे पंचनामे होत राहतील, कागदं रंगत राहतील… पण लेकराबाळांच्या तोंडाशी आलेला घास हिरावलेल्या या बापाला आधार कोण देणार? आंबेगावचा हा थरकाप उडवणारा पाऊसामुळे अनेकांची स्वप्न उद्ध्वस्त झाली आहे.
आभाळ फाटलंय आणि शेतकऱ्याचं नशीब काळवंडलं..
निसर्ग जेव्हा ‘कसाई’ होतो, तेव्हा काय होतं, याचं जिवंत स्मशान सध्या उत्तर पुणे जिल्ह्यात पाहायला मिळतंय. आभाळ फाटलंय आणि शेतकऱ्याचं नशीब काळवंडलंय. रात्रीच्या काळोखात आलेल्या त्या काळरुपी पावसाने आणि रक्ताच्या थारोळ्यासारख्या पडलेल्या टपोऱ्या गारांनी उभ्या पिकांची ‘कत्तल’ केलीय. वावरात आता पिकांचा सळसळाट नाही, तर उद्ध्वस्त झालेली ‘स्मशान शांतता’ उरलीय.
कलिंगडाच्या चिंधड्या अन् सोन्यासारखा गहू जमिनदोस्त
नजर जाईल तिथं फक्त विध्वंस! काढणीला आलेला कांदा गारांनी असा काही ठेचलाय की माती आणि पीक एक झालंय. कलिंगडाच्या चिंधड्या झाल्यात, सोन्यासारखा गहू जमिनीला कवाळलाय. उभ्या फळबागा मुळासकट उपटून फेकल्यात. निसर्ग तर वैरी झालाच, पण आता ‘एसी’त बसलेली व्यवस्था या चिखलात पाय रोवून उभ्या असलेल्या शेतकऱ्याला सावरणार का? का पुन्हा एकदा मदतीची घोषणा फक्त कागदावरच जिरणार?, असा प्रश्न मनात खेळत आहे.
गाराने २० मुक्या शेळ्या-मेंढ्यांचा जागीच बळी घेतला
हे तांडव फक्त शेतापुरतं मर्यादित नाही. आंबेगावच्या वाळूजनगरमध्ये निसर्गाचं क्रूर रूप पाहायला मिळालं. वादळी वाऱ्याने झाडं उन्मळून पडली आणि गारांच्या त्या जीवघेण्या माऱ्याने २० मुक्या शेळ्या-मेंढ्यांचा जागीच बळी घेतला. पोल्ट्री फार्ममध्ये हजारो कोंबड्यांचा खच पडलाय. ज्या पशुधनावर घरची चूल पेटत होती, तीच जनावरं आज निपचित पडलीत. पशुपालकांच्या डोळ्यातील पाणी आता सुकून गेलंय, उरलाय तो फक्त कोरडा आक्रोश!
साहेब, फोटोने पोट भरत नाही आणि सांत्वनाने बँकांचं कर्ज फिटत नाही
आता नेहमीचं रडगाणं सुरू होईल… अधिकारी येतील, बांधावर उभे राहून फोटो काढतील, सांत्वन करतील. पण साहेब, फोटोने पोट भरत नाही आणि सांत्वनाने बँकांचं कर्ज फिटत नाही! ज्याचा संसार उघड्यावर पडलाय, त्याला शब्दांच्या फुलोऱ्याची नाही, तर तातडीच्या आर्थिक मदतीची गरज आहे. ही मदत वेळेत मिळाली नाही, तर आंबेगावचा हा बळीराजा पुन्हा उभा राहण्याची ताकद हरवून बसेल.
हजारो हातांना अन्न देणारा जगाचा पोशिंदा आज स्वतःच दाण्यादाण्यासाठी अगतिक झालाय. निसर्गाच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’ने शेतकऱ्याच्या कंबरेचं हाडच मोडलंय. आता चेंडू मायबाप सरकारच्या कोर्टात आहे. सरकारने आता ‘फाईल’चा खेळ न खेळता, थेट शेतकऱ्याच्या पदरात मदत टाकावी, हीच अपेक्षा.










