पिंपरी चिंचवड येथील सांगवी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कल्पतरू फेज थ्री येथे राहणाऱ्या एका बँक मॅनेजरच्या घरात एका उच्चशिक्षित मणिपुरी तरुणाने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडे असलेल्या हॅन्ड गन , 19 बुलेटस, दोन हँड ग्रॅन्ड सदृश्य वस्तू आणि कुकरी यासर्व वस्तू जमा केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जुलै रोजी संद्याकाळी सात वाजता पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर सिताराम बडेजा यांच्या घरात महिलांचे वस्त्र परिधान करून तसेच चेहऱ्यावर स्कार्फ बांधून आरोपी सांगबोई कोम सेरटो ह्या मणिपुरी तरुणाने कुरियर देण्याचे कारण सांगत घरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने हॅण्ड गनने मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र बडेजा बंधूंनी त्याला आवरून आपल्या घरात असलेल्या दोरीने बांधून बंदिस्त केलं. यः आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












