पुण्यासारख्या शहरात आपले हक्काचे घर असावे ही प्रत्येकाची इच्छा असते. काहींची ही इच्छा पूर्ण होते तर काहींची होत नाही. आता तुमची देखील पुण्यात घर घेण्याची इच्छा असेल तर लवकरच पूर्ण होणार आहे. कारण पुण्यात म्हाडाने घर घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे.
पुण्यात तुम्हाला मोक्याच्या ठिकाणी स्वस्तात मस्त असे घर घ्यायचे असेल तर ही बातमी नक्कीच वाचा. कारण म्हाडाने लॉटरी जाहीर केली आहे. यामुळे तुम्ही सर्वसामान्य घरातील असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. म्हाडाच्या या लॉटरी साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून 6168 घरे या लॉटरी मधून देण्यात येणार आहे.
म्हाडाने पुण्याच घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या बंपर लॉटरीमधून 6168 घरे देण्यात येणार आहेत. त्यापैकी 1982 घरे ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या नुसार देण्यात येणार आहेत. या लॉटरीच्या माध्यमातून स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देण्यात येणार असून म्हाडा लॉटरीचा फॉर्म भरण्यासाठी प्रत्येक अर्जासोबत अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ही अनामत रक्कम उत्पन्न गटानुसार वेगवेगळी करण्यात आली आहे.
म्हाडाच्या लॉटरी साठी अर्ज करत असाल तर तुम्हाला अल्प उत्पन्न गटात 10,000 रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. यासह अर्ज शुल्क रुपये 600 + GST 18 % रुपये 108 म्हणजे एकूण 10,708 रुपये भरावे लागणार आहे. तर अत्यल्प उत्पन्न गटासाठी 20,000 रुपये अनामत रक्कम सह अर्ज शुल्क रुपये 600 + GST 18 % रुपये 108 म्हणजे एकूण – 20,708 रुपये भरावे लागणार आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम – 30,000 रुपये आणि अर्ज शुल्क रुपये 600 + GST 18 % रुपये 108 असे एकूण – 30,708 रुपये भरावे लागेल. जर तुम्ही उच्च उत्पन्न गटातून अनामत रक्कम – 40,000 रुपये यासह अर्ज शुल्क रुपये 600 + GST 18 % रुपये 108 असे एकूण – 40,708 रुपये भरावे लागणार आहे.
सर्वात स्वस्त आणि मस्त घर
पुणे म्हाडाच्या लॉटरीत सर्वात स्वस्त घर हे 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत देण्यात येणार असून PMRDA हद्दीत हे घर असेल. सदनिकेचे बांधकाम क्षेत्रफळ 34.61 ते 41.87 चौरस मीटर इतके आहे. सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 23.60 ते 29.02 चौरस मीटर आहे. या एकूण सदनिका 64 एवढ्या असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील सर्वात स्वस्त घराची किंमत ही 7 लाखांपेक्षा कमी आहे. या सदनिकेची अंदाजे किंमत 695,000 रुपये आहे. सदनिकेचे बांधकाम क्षेत्रफळ (चौ. मी.) 27.74 इतके आहे. सदनिकेचे चटई क्षेत्रफळ (चौ. मी.) 23.74 आहे. एकूण सदनिका या 3 असतील.
अर्ज करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा
अर्जदारास सोडतपूर्वी अनामत रक्कम भरल्यानंतर, अर्ज कोणत्याही कारणास्तव रद्द करता येत नाही. अर्जदाराने Credit Card द्वारे अनामत रक्कम भरल्यावर ही रक्कम कोणत्याही कारणाने म्हाडाच्या खात्यामध्ये पोहचली नाही किंवा पोहोचण्यापूर्वी कोणत्याही कारणास्तव अर्जदाराच्या खात्यात परत आली तर अशा अर्जदारांचा अर्ज सोडतीकरीता ग्राह्य धरला जाणार नाही.
अशी करा प्रोसेस
सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्यासाठी https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा आपल्या मोबाईलमध्ये MHADA Lottery हे ॲप डाऊनलोड करा. अर्ज भरण्याची पद्धत, घरांच्या किमती या बाबत सविस्तर माहिती मिळविण्यासाठी म्हाडा लॉटरी 2025 या लिंकवर क्लिक करुन अधिकृत जाहिरातीची पीडीएफ फाईल पहावी, त्यात सर्व माहिती मिळेल. सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात 11 सप्टेंबर 2025 पासून झाली आहे. तर शेवटची तारीख ही 31 ऑक्टोबर आहे.