पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सायन्स पार्क आणि तारामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, सायन्स एज्युकेशन ट्रस्ट, इस्रो-एसपीपीयू एसटी आणि भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (पुणे) यांच्या सहकार्याने 23 ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय अवकाश दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त महापालिकेच्या सायन्स पार्क येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय अवकाश दिनाची या वर्षीची थीम ‘आर्यभट्ट ते गगनयान – प्राचीन ज्ञान ते अनंत शक्यता’ अशी आहे. भारताच्या अवकाश संशोधन प्रवासाचा आणि त्याच्या उज्वल भविष्याचा आढावा यानिमित्ताने घेतला जाणार आहे. त्या अनुषंगानेच सायन्स पार्क येथे 23 ऑगस्ट रोजी विविध उपक्रम होणार आहेत. यामध्ये सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (पुणे) तर्फे विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना चंद्रावर चालण्याचा अनुभव मिळावा यासाठी ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी मून वॉक’ हा विशेष उपक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. तसेच ‘मेक अँड टेक’ उपक्रमांतर्गत सहभागी होऊन नागरिक अवकाशाशी निगडित मॉडेल्स तयार करू शकणार आहेत.
ज्येष्ठ इस्रो शास्त्रज्ञ ए. के. सिन्हा यांचे ‘इस्रो टुवर्ड्स नॅशनल प्रॉस्पेरिटी’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन
ज्येष्ठ इस्रो शास्त्रज्ञ ए. के. सिन्हा यांचे ‘इंडिया इन्टू स्पेस – इस्रो टुवर्ड्स नॅशनल प्रॉस्पेरिटी’ या विषयावरील व्याख्यान सकाळी ११:३० ते दुपारी १२:३० या वेळेत तारांगण सभागृहात होणार आहे. ए. के. सिन्हा यांनी ३६ वर्षे इस्रोमध्ये काम केले असून भारताच्या अंतराळ संशोधनात त्यांचा मोठा वाटा आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड सायन्स पार्कने नेहमीच विज्ञानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले – आयुक्त शेखर सिंह
राष्ट्रीय अवकाश दिन हा आजच्या तरुण पिढीला विज्ञानाची प्रेरणा देणारा दिवस आहे. पिंपरी चिंचवड सायन्स पार्कने नेहमीच विज्ञानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. यंदा राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त ‘आर्यभट्ट ते गगनयान’ हा आपल्या देशाचा प्रवास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सायन्स पार्कमध्ये आयोजित केलेले उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरतील. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रती जिज्ञासा निर्माण होईल. असे वक्तव्य पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
सायन्स थीम पार्कला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी अंतराळ समजून घेण्याची संधी- संचालक प्रविण तुपे
पिंपरी चिंचवड सायन्स थीम पार्कला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी अंतराळ समजून घेण्याची संधी राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त मिळणार आहे. या संधीचा लाभ घेऊन ते भारताच्या अंतरिक्ष प्रवासाच्या या ऐतिहासिक वाटचालीत सहभागी होऊ शकतात. असे सायन्स पार्कचे संचालक प्रविण तुपे यांनी सांगितले.