पुणे : दिवाळीला काही दिवस बाकी असतानाच पुणे पोलिसांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता दिवाळीला ध्वनिप्रदूषण करणारे फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. म्हणजे यंदाची पुणेकरांची दिवाळी ध्वनिप्रदूषणमुक्त होणार आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहे.
यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री 10 ते सकाळी 6 वाजेच्या सुमारास बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे कोणीही उल्लंघन केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांसंबंधित महत्वपूर्ण निर्देश दिले आहे. त्यानुसार ध्वनी मर्यादा फिक्स करून देण्यात आली आहे. त्यानुसार फटाक्यांचा आवाज 124 डेसिबलपेक्षा जास्त नसावा. तसेच 100 पेक्षा जास्त साखळी फटाक्यांच्या उत्पादनावर, विक्री आणि वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यासह शांतता क्षेत्रात जसे कि, शाळा, रुग्णालय आणि न्यायालयाच्या परिसरापासून 100 मीटरच्या आत फटाके उडवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.आणि या परिसराला ‘शांतता क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
दिवाळीला तुम्ही जर सार्वजनिक ठिकाणी फटाके उडवले तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. यामध्ये रस्ते, पूल, घाट, सेतू किंवा कोणत्याही प्रमुख मार्गाचा समावेश आहे. या मार्गावर किंवा या मार्गाच्या 10 किलोमीटरच्या परिसरातही फटाके उडवण्यास सक्त मनाई आहे.
फटाके विक्रेत्यांसाठी तात्पुरते परवाने
दरवर्षी दिवाळीत फटाके विक्रेत्यांना ठराविक कालावधीत तात्पुरते परवाने दिले जातात. त्यानुसार यंदाही फटाके विक्रेत्यांना 20 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत तात्पुरते परवाने दिले जाणार आहे. पुण्यातील नागरिकांची दिवाळी शांततेत आणि सुरक्षितपणे साजरी व्हावी यासाठी आणि ध्वनिप्रदूषण टाळता यावे यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर पोलीस पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार तातडीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे.