पूणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी आणि नागरिकांना वाहतुक नियमांची सवय लावण्यातही वाहतूक पोलीस सतत कार्यरत असतात. जे नागरिक वाहतुकीचे नियम मोडतात त्यांच्यावर आरटीओच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते. त्यानुसार पुणे शहरातून आरटीओ ने 6 हजार 296 ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याची शिफारस केली आहे.
पुणे शहरातील वाहतूक पोलीस आणि RTO ने जानेवारी 2023 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यांनी तब्बल 6 हजार 296 ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केले आहे. यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणे, विना हेल्मेट गाडी चालवणे, वाहतूक सिग्नल तोडणे, वाहन चालविताना मोबाईल फोन पाहणे, वेगात गाडी चालवणे या गंभीर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करत 456 लायसन्स निलंबित करण्यात आले होते, तर 2023 मध्ये ही संख्या 998 वर पोहोचली होती. 2024 मध्ये 4 हजार 554 तर 2025 च्या सप्टेंबर पर्यंत 744 लायसन्स निलंबित करण्यात आले. नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी दररोज पावती फाडली जाते. परंतु तुम्ही गंभीर नियमांचे उल्लंघन केल्यास तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यासाठी नियमांचे उल्लंघन केलेल्या व्यक्तींची नावे पुणे आरटीओकडे पाठवली जातात.
“आम्ही वारंवार होणारे गुन्हे, इतरांचे जीवन धोक्यात आणणारे वर्तन सहन करत नाही. आम्ही वाहन चालकांना आवाहन करतो की, शिक्षेच्या भीतीमुळे नाही, तर स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करा.” असे पुण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले.
पुणे शहरातील आरटीओने नागरिकांना दिवाळी जबाबदारीने साजरी करण्याचे आवाहन केले असून रस्त्यांवर सुरक्षितता राखण्याबाबतही सांगितले आहे.