Pune Crime News : शिक्षणाचे माहेर म्हटलं जाणाऱ्या पुणे शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शिक्षणाच्या नावाखाली एक अल्पवयीन मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना निगडी येथे घडली आहे. दोन अल्पवयीन मुलींना जादा क्लासेसच्या नावाखाली बोलावून त्यातील एका अल्पवयीन मुलीचा शिक्षकाने विनयभंग केला. ही घटना निगडीतील उच्च शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षांच्या क्लासमध्ये घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन चव्हाण याने पिडित मुलगी आणि तिच्या मैत्रीणीला जादा क्लासेससाठी शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास बोलविले. त्यानंतर मैत्रीणीला रसायनशास्त्राचा पेपर सोडविण्यासाठी देऊन चौथ्या मजल्यावर पाठविले. त्यानंतर थोड्या वेळाने ती मैत्रीण काय करते हे पाहण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला लिफ्ट मध्ये नेऊन तिचा विनयभंग केला असल्याचे पिडित मुलीने तक्रारीमध्ये म्हटल्याचं सांगितलं आहे.
हेही वाचा – विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीवरून मारली उडी, आत्महत्या होती की घातपात ? शाळेवर गंभीर आरोप
चेतन सुरेशराव चव्हाण (वय ४०, रा. इंम्पिरीयल हाइटस्, भारतमाता हौसिंग सोसायटी, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे शिक्षकाचे नाव आहे. याबाबत १७ वर्षीय मुलीने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर ती मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत बसली असता ऑफिस बंद करण्यासाठी खाली चल म्हणून तिच्या मागे लागला. तिने विरोध केला असता डोळे मोठे करून तिला दम देत पुन्हा लिफ्ट मधून खाली येत असताना पुन्हा तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीमध्ये म्हटलं आहे.
तुला सोडविण्यासाठी घरी येतो असेही आरोपी चेतन चव्हाण म्हणत होता. मात्र मला मावशीकडे जायचे आहे, असे सांगून तिने सुटका करून घेतली. त्यानंतर घरी गेल्यावर तिने घडलेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. वडिलांनी थेट निगडी पोलीस ठाणे गाठत याबाबत गुन्हा दाखल केला. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या निगडी शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला. तर गेल्या महिन्यात महापालिकेच्या वाल्हेकरवाडी येथील शाळेतही १० वर्षीय मुलीचा विनयभंग शिक्षकाने केला होता.












