BJP Congress Inclusive Debate : सध्या कोणत्या पक्षाचे राजकारण कोणत्या दिशेला वळण घेईल हे सांगता येत नाही. काँग्रेस मुक्त भारत असा नारा देणारी भाजपा काँग्रेस युक्त कधी झाली त्यांनाच समजले नाही. भाजपची मुळ विचारधारेला बाजूला ठेवून काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षात घेतलं आहे. अंबरनाथ येथे भाजपने काँग्रेसला सोबत घेऊन एक विचित्र युती केल्याचे समोर आलं. तर दुसरीकडे अकोल्याच्या अकोटमध्येही अनेकांना धक्का बसणारी राजकीय समीकरणं जुळविण्यात आली आहे. इथे देखील भाजपने असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM पक्षासोबत युती केली आहे. त्यामुळे भाजपवर सर्व स्तरातून सडकून टीका झाली.
हेही वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला मराठवाडाच्या विकासाचा रोड मॅप
अंबरनाथ नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेसची युती झाल्यानं राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला. भाजप, काँग्रेसच्या युतीची बातमी देशभरात गाजली. काँग्रेसनं तातडीनं पावलं उचलत सर्वच्या सर्व १२ नगरसेवकांना निलंबित केलं. अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत काँग्रेसनं निलंबित केलेल्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत १२ नगरसेवकांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. या घडामोडी शिंदेसेनेसाठी, विशेषतः शिंदे पितापुत्रांसाठी धोक्याची घंटा मानल्या जात आहेत.
काँग्रेसनं तर थेट १२ नगरसेवकांचं निलंबन केलं
अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेनं सर्वाधिक २७ जागा जिंकल्या. तर भाजपनं १४, काँग्रेसनं १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपनं काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेत सेनेला सत्तेपासून दूर ठेवलं. पण या विचित्र युतीची चर्चा सगळीकडे झाली. काँग्रेस, भाजपच्या राज्य नेतृत्त्वानं तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेसनं तर थेट १२ नगरसेवकांचं निलंबन केलं. भाजपलाही टिकेचा सामना करावा लागला. पण अवघ्या २४ तासांत भाजपनं डाव फिरवला.
भाजप वरिष्ठांच्या मूकसंमतीनंच हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा
काँग्रेस सोबत युती करण्याचा निर्णय अंबरनाथमधील स्थानिक नेते त्यांच्या वरिष्ठांच्या संमतीशिवाय घेतील, याची शक्यता अतिशय कमी आहे. भाजपची संघटना शिस्तबद्ध आहे. त्यामुळे वरिष्ठांना न कळवता काँग्रेस सोबत युती करण्याचा निर्णय परस्पर घेण्यात आला, असं म्हणण्यास जागा उरत नाही. वरिष्ठांच्या मूकसंमतीनंच हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. काँग्रेसनं नगरसेवकांचं निलंबन करुन २४ तासही उलटले नसताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्या बाराही नगरसेवकांना पक्षात घेतलं. हा शिंदेसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.












