Farmers funds Fadnavis announcement : पंचनामे झाले तसे राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना येत्या पंधरा ते वीस दिवसांत नुकसान भरपाईचे पैसे वाटप केले जातील. नुकसान भरपाईच्या पॅकेजचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला. नुकसान भरपाईसाठी आणखी ११ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजला मान्यता देण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजमधील ८ हजार कोटी आत्तापर्यंत वितरीत करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदापूर येथे दिली.
हमीभावापेक्षा कमी भावात माल विकू नका –
व्यापारी हमीभावाप्रमाणे जर तुमचा माल खरेदी करत असतील आवश्य विका, मात्र, हमीभावापेक्षा कमी भाव व्यापारी देत असतील तर नोंदणी करून सरकारच्या खरेदी केंद्रावर आपला शेतीमाला टाका. आपल्या खात्यामध्ये आपल्याला पैसे दिले जातील. सरकारी खरेदी केंद्राची नोंदणी ३० ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. सरकार राज्यात कापूस आणि सोयाबीन खरेदी सुरु करणार आहे. त्यासाठी आधी नोंदणी केली जाणार आहे. हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना ३० ऑक्टोबरपासून नोंदणी करता येणार आहे. नोंदणी झाल्यानंतर हमीभावाने खरेदी सुरू होईल. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांने कमी भावात व्यापाऱ्यांना सोयाबीन विकू नये, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
शेतकऱ्यांनी गोंधळ करून घेऊ नये –
राज्यामध्ये जी अतिवृष्टी आणि महापूर आला त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने जी मदत जाहीर करण्यात आली त्याचा आढावा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आतापर्यंत जो निधी गेला आहे तो वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गेला आहे. याचं कारण सरकारच्या वतीने एक निर्णय घेण्यात आला होता. जशा याद्या येतल तसे पैसे वितरित करण्यात येतील. कोणत्या गोष्टींमुळे थांबायचं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळ करून घेऊ नये. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या पंधरा ते वीस दिवसांत पैसे टाकण्यात येतील.
कोणतीही पात्र व्यक्ती यामधून सुटू नये Farmers funds Fadnavis announcement
त्यामुळे पुढील पंधरा दिवासांत ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. उर्वरित १० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी आणखीन काही दिवासांचा कालावधी लागेल. त्याचं कारण म्हणजे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अडचणी आहेत, काहींच्या नोंदणीत अडचणी आहेत. काही ठिकाणी दुहेरी खातेधारक आहेत यातून लवकर मार्ग काढला जाईल. सरकारकडे निधीची कोणतीही कमतरता उरलेली नाही. मात्र, शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे या याद्या दोन वेळा तपासल्या जातात. कारण कोणतीही पात्र व्यक्ती यामधून सुटू नये, तसेच जे पात्र नाहीत त्यांच्या खात्यात पैसे जाऊ नयेत. याकरता या याद्या तपासल्या जातात.












