सामाजिक कार्यकर्त्या करुणा शर्मा यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय आणि प्रशासकीय खळबळ माजली आहे. “मोठे अधिकारी आणि मंत्री सुरुवातीला हनीमूनसारखा प्रेमळ वागत असतात, पण नंतर तेच वागणं ‘हनी ट्रॅप’मध्ये परिवर्तित होतं!” असा धक्कादायक खुलासा करुणा शर्मांनी एका व्हिडीओद्वारे केला आहे.
हनी ट्रॅपचं वाढतं जाळं
करुणा शर्मा यांनी जाहीरपणे सांगितलं की वेळ आल्यावर त्या सर्व पुरावे चॅनेलवर उघड करतील. त्यांनी कोणत्याही नावाचा उल्लेख केला नाही, मात्र त्यांच्या भाषेतून गंभीरता स्पष्ट होते. याआधी देखील महाराष्ट्रातील ७२ हून अधिक क्लास वन अधिकारी आणि काही माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली होती. हे वृत्त सरकारने फेटाळले असले तरी, कोणीही ठोस भूमिका घेतली नव्हती.
सरकारवर संशयाची सावली
या प्रकरणावर सरकारने अधिकृत भूमिका न घेतल्यामुळे महायुती सरकारवर संशयाची छाया आणखी गडद झाली आहे. विशेष म्हणजे, ज्या प्रकारे करुणा शर्मा यांनी आपले वक्तव्य मांडले, त्यावरून त्या काही महत्त्वाची माहिती लपवत असल्याचंही स्पष्ट होतं.
त्यांनी सांगितलं की, “सध्या योग्य वेळ नाही, पण वेळ आली की मी सर्व माहिती, पुरावे आणि क्लिपिंग चॅनेलवर दाखवणार आहे. मगच लोकांनाही समजेल की कोण काय करतंय.”
राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ
करुणा शर्मा यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यांच्या वक्तव्यांनंतर अनेकांनी सरकारकडे आणि पोलीस प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे. हनी ट्रॅप हे केवळ व्यक्तिगत फसवणुकीचं प्रकरण नसून, त्यात प्रशासकीय आणि आर्थिक भ्रष्टाचाराचीही शक्यता वर्तवली जात आहे.
हनी ट्रॅपविरोधात कारवाई होणार का?
याआधी अनेक वेळा हनी ट्रॅपच्या बातम्या समोर आल्या आहेत, पण प्रत्यक्षात फारशा कारवाया झालेल्या नाहीत. आता करुणा शर्मा यांनी थेट आरोप केल्यामुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. सरकार आणि संबंधित यंत्रणांनी यावर ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेतूनही होत आहे.