मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील आता दिल्लीत धडक देणार आहेत. विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन केलं होतं. यानंतर सरकारनं मनोज जरांगे यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यानंतर आनंद साजरा करत मराठा आंदोलक माघारी गेले. मनोज जरांगे यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात असतानाच मनोज जरांगे यांनी दिल्ली गाठणार असल्याची मोठी घोषणा केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मराठ्यांचं वादळ आता दिल्लीत धडकणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी चलो दिल्लीचा नारा दिला आहे. तिथं ते देशभरातील मराठा समाजाचं अधिवेशन घेणार आहेत. लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर होणार असल्याचं म्हटलं जात आहे. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटच्या अंमलबजावणी झाल्यानंतर दिल्लीमध्ये मराठा समाजाचं अधिवेशन होणार आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे. दिल्लीत आनंदोत्सव साजरा करायला जाणार. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटच्या अंमलबजावणी झाल्यानंतर आनंद सोहळा म्हणून दिल्लीला जाऊ. तिथं आरक्षण नाही, कोणतंही आंदोलन नाही, मागणी नाही. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी अटकेपार झेंडा लावला, ती ठिकाणं पाहायला जाणार, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरु केलं होतं. हजारो मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मुंबईत आले होते. या आंदोलनाला यश आलं. सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या, तर काही मागण्या पूर्ण होण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी ही मोठी घोषणा केली आहे. अशातच राज्य शासनाने नुकत्याच काढलेल्या नवीन जीआर नुसार कुणबी नोंदी आढळलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कुणबी प्रमाणपत्र कसं काढणार
अर्जदाराने जात प्रमाणपत्रासाठी थेट उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे अर्ज करावा. त्यानंतर अर्जाची पडताळणी स्थानिक समितीकडे पाठवली जाईल. या समितीकडून वंशावळ तपासणी केली जाईल. त्याचबरोबर जुन्या नोंदी, ग्रामपंचायत दाखले, रहिवासी दाखला, वाडवडिलांच्या नोंदी यांसारखे कागदपत्र तपासले जातील. चौकशीचा अहवाल मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रमाणपत्र देण्याचा अंतिम निर्णय घेतील. यासाठी शासनानं समिती सदस्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचाही निर्णय घेतला आहे. प्रशिक्षणामध्ये जात प्रमाणपत्राच्या नियमावली, चौकशीची पद्धत, अहवाल तयार करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींचं मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1) जर अर्जदार भूधारक, भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईनं शेती करणारा असेल, तर त्या संबंधित जमीनधारकतेचा पुरावा सादर करणं आवश्यक आहे.
2) वरील पुरावा उपलब्ध नसल्यास, अर्जदारानं 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी त्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत होते, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करणं आवश्यक आहे.
3) अर्जदाराच्या गावातील किंवा कुलातील नातेसंबंधीत व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालं असल्यास, त्यांचं नातेसंबंध सिद्ध करणारं प्रतिज्ञापत्र जोडणं आवश्यक.
4) याशिवाय अर्जासोबत इतर कोणतेही पुरावे (जसं की जुनी कागदपत्रे, उत्पन्न दाखले, शालेय दाखले इ.) जोडता येतील.