देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. आजच्या तरुणांना लाजवेल अशी त्यांच्यात एनर्जी आहे. कारण वयाच्या 75 व्या वर्षी देखील ते फिट दिसतात. देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनलेले नरेंद्र मोदी या वयात देखील उत्साही दिसून येतात. तसेच त्यांचा प्रेरणादायी प्रवास आजच्या तरुणाना मोटिव्हेशन देणारा आहे. आज जाणून घेऊया त्यांच्या आता पर्यंतच्या त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल..
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलताना राजकारण आणि त्यांचे निर्णय नेहमीच चर्चेत असतात. परंतु त्यांच्या जीवनाचा एक वेगळा पैलू आहे जो राजकारणाच्या पलीकडे जातो. त्यांच्या वैयक्तिक शिस्तीचे, अध्यात्मिक साधनेचे आणि साधेपणाचे दर्शन आपल्याला मोदींच्या नवीन रूपातुन आपल्याला दिसतात. तसेच पंतप्रधान मोदींच्या प्रवासाचा केंद्रबिंदू म्हणजे राष्ट्रसेवेची अखंड भावना आहे. मोदी म्हणतात की, राजकारण हा सत्तेसाठीचा मार्ग नसून सेवेसाठीचा ध्यास आहे. मोदी समर्थक यांच्या मते नरेंद्र मोदी हे एक मिशन-केंद्रित नेते आहे.
मोदींच्या दैनंदिन जीवनात कठोर शिस्त दिसून येते. त्यांचा दिवस पहाटे योग व ध्यानाने सुरु होतो. या साधनांमुळे त्यांना मानसिक एकाग्रता आणि शारीरिक तंदुरुस्ती मिळते. योगाबद्दलच्या त्यांच्या आग्रहामुळेच संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्यांनी त्यांच्या रोजच्या आहारातही अत्यंत साधेपणा पाळल्याचे दिसते. मोदी शाकाहारी असून ते प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळतात. एवढंच नाही तर ते दरवर्षी नवरात्रीत दीर्घ उपवास करतात तर कधी कधी नऊ दिवस फक्त कोमट पाणी पितात. त्यांच्या जीवनातील हा आत्मनियंत्रण व साधेपणा त्यांच्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक मानला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकारणात येण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात म्हणजेच RSS मध्ये पूर्णवेळ स्वयंसेवक होते. घर-परिवार मागे सोडून त्यांनी निष्काम कर्म करण्याचा निर्णय घेतला. यामुळेच त्यांच्या जीवनात कर्तव्याला नेहमीच प्राधान्य मिळाले.
त्यांच्या लोकप्रियतेमागे एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा लोकांशी होत असलेला थेट संवाद आणि संवाद साधण्याची पद्धत. मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर “मन की बात” हा कार्यक्रम सुरु केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते लाखो लोकांशी संवाद साधतात. या कार्यक्रमात फक्त धोरणांबद्दल नाही, तर समाजमूल्ये, संस्कृती आणि प्रेरणादायी गोष्टींवर मोदी भाष्य करतात.
मोदींच्या जीवनात भारतीय संस्कृती आणि परंपरेला विशेष स्थान आहे. सण साधेपणाने साजरे करणे, स्थानिक परंपरा प्रोत्साहित करणे आणि जागतिक स्तरावर भारताच्या अध्यात्मिक वारशाला महत्त्व देणे हे सर्व त्यांच्या कार्यशैलीत दिसून येते. राजकारणाबाहेर मोदींना निसर्गाची विशेष आवड आहे. ते निसर्गात रमतात आणि अनेकदा वन्यजीवांचे व दृश्यांचे फोटो काढताना दिसतात. या आवडीमुळे त्यांना त्यांच्या बिझी कामात अविस्मरणीय क्षण मिळतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजकीय रणनीती जरी चर्चेचा विषय असली तरी त्यांचे वैयक्तिक मूल्य आणि अध्यात्मिक प्रेरणा हे त्यांचे खरे बळ आहे. शिस्त, साधेपणा आणि अध्यात्म या गुणांमुळे ते केवळ राजकारणी नव्हे तर सेवाभावी नेता म्हणून ओळखले जातात. दरवर्षी मोदींच्या वाढदिवशी त्यांचे समर्थक फक्त पंतप्रधानाचा गौरव करत नाहीत, तर एका अशा नेत्याचा सन्मान करतात ज्याचे जीवन कर्तव्य, सेवाभाव आणि भारतीय संस्कृतीवरील प्रेमाचे प्रतीक आहे.