मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता. पण, तुमचा ब्रँड नाही. भाजपा हा कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष आहे. चहा विकणारा जगात जागतिक ब्रँड झाला. नरेंद्र मोदी नावाचा जगातील सर्वांत मोठा ब्रँड आमच्याकडे आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना लगावला. काहीही झालं तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा झेंडा फडकवून महायुतीचाच महापौर होणार, असा विश्वासही व्यक्त करीत त्यांनी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
मुंबई भाजप प्रदेशच्या वतीने मुंबईत वरळी येथील डोम सभागृहात विजयी संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेचे गटनेते आ. प्रवीण दरेकर यांच्यासह मुंबईतील आमदार, माजी मुंबई प्रदेश अध्यक्ष, माजी आमदार यावेळी उपस्थित होते.
मुंबईच्या महानगरपालिकेमधील भ्रष्टाचाराला बाहेर काढणारी भाजपाची सामान्य व्यक्ती महापौर होणार आहे. ज्या कोविड काळात सामान्यांना बेड मिळत नव्हते, ऑक्सिजन मिळत नव्हता त्याच काळात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला. निवडणूक आल्यावर हे कफनचोर कोणत्या तोंडानं मतं मागायला जाणार आहेत, असा सवाल फडणवीस यांनी केला. उद्धव ठाकरे यांची 100 भाषणं काढून बघा. मुंबईच्या विकासाबद्दल बोलले असतील तर 100 रुपये द्यायला तयार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबईनं अनेक राज्यांना, देशाला, जगाला भरभरून दिलं आहे. ते आता मुंबईला परत करण्याची वेळ आली असून, भाजपा महायुतीचं सरकार पालिकेच्या माध्यमातून केल्याशिवाय राहणार नाही. बीडीडी चाळींसारखाच धारावीचा विकास करुन 10 लाख लोकांना तिथेच घरे देणार. मुंबईच्या विकासासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राजकीय पक्षाच्या सभेला परदेशी राजदूतांनी हजेरी लावल्याचा प्रसंग भाजपच्या विजयी मेळाव्यात घडला. ब्रिटीश डेप्युटी हाय कमिशनचे राजकीय, द्विपक्षीय व्यवहारप्रमुख जॉन एम. निकेल, सिंगापूर प्रजासत्ताकाचे राजकीय वाणिज्यदूत जेरोम वाँग व आयर्लंडचे उपमहावाणिज्य दूत टॉम नूनन उपस्थित होते.
दोन भावांच्या पक्षाला सभेसाठी टीझर रिलीज करावा लागतो. कधी ट्रेलर दाखवावा लागतो. पण, भाजपाची ताकद ही टीझर-ट्रेलरमध्ये नाही. अध्यक्षांनी फक्त टिचकी मारल्यावर संध्याकाळीही एवढी मोठी सभा भरते. मुंबईचा खरा आवाज कोणाचा आहे, हे स्पष्ट होते, असं मंत्री आशिष शेलार म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपची संघटनशक्ती एकत्र येण्याची गरज असल्याचं सांगितलं. तर निवडणूक आल्यावर यांना मराठी माणूस आठवतो. त्यामागे वेगळेच राजकारण आहे. भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्यासह मुंबईचा विकास, प्रगती, सुरक्षित ठेवण्याची ही लढाई आहे, असं मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम म्हणाले.