PM Modi Gujarat visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार (29 ऑक्टोबर) मुंबईत आयोजित इंडिया मेरीटाईम वीक 2025 मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला संबोधित केलं. यानंतर आजपासून नरेंद्र मोदी हे गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. गुजरामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दिन कार्यक्रमात नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.
अनेक प्रकल्पांचं करणार उद्घाटन :
दरम्यान या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात येणार आहे. तसंच पंतप्रधान केवडिया येथील एकता नगरमध्ये असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं एकता समारंभाचं नेतृत्व करतील. पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी (30 ऑक्टोबर) एकता नगरमध्ये पोहोचतील. त्यानंतर पंतप्रधान इलेक्ट्रिक बसेसना हिरवा झेंडा दाखवतील आणि अंदाजे 1,140 कोटी किमतीच्या विविध विकास आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
नाणं आणि टपाल तिकिटाचं होणार प्रकाशन :
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील इम्पीरियल स्टेट्स म्युझियम, वीर बालक उद्यान, क्रीडा संकुल, वर्षावन प्रकल्प, शूलपानेश्वर घाटाजवळील जेट्टी विकास आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरातील ट्रॅव्हलेटर्स या प्रकल्पांचं उद्घाटन करतील. या सर्वांचा उद्देश पर्यटकांचा अनुभव समृद्ध करणं आणि परिसरातील सर्वांगीण विकासाला चालना देणं आहे. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 150 रुपयांचं विशेष स्मारक नाणं आणि टपाल तिकिटाचं प्रकाशन करतील.
राष्ट्रीय एकता दिन (PM Modi Gujarat visit)
दरम्यान, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवशी (31 ऑक्टोबर) राष्ट्रीय एकता दिन साजरा केला जातो. त्यानुसार, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं सरदार वल्लभभाई पटेल यांना पुष्पांजली अर्पण करून करतील. तसंच राष्ट्रीय एकता दिनाचं मुख्य आकर्षण म्हणजे एकता दिन परेड असणार आहे. ज्यामध्ये विविध राज्य पोलीस दल तसंच बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबीच्या तुकड्यांचा समावेश असणार आहे. याबरोबर, यावेळी आयोजित कार्यक्रमात सीआरपीएफच्या 5 शौर्य चक्र पुरस्कार विजेत्यांना आणि बीएसएफच्या 16 शौर्य पदक विजेत्यांना सन्मानित केलं जाईल. तसंच ऑपरेशन सिंदूरमधील बीएसएफ जवानांना देखील सन्मानित केलं जाणार आहे.











