Rahul Gandhi in Bhiwandi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी मुंबईत आले. 2014 च्या मानहानीच्या खटल्यासंदर्भात ते आज भिवंडी न्यायालयात हजर राहणार आहेत. त्यांचे वकील नारायण अय्यर यांनी सांगितलं की, खटला सुरु आहे आणि त्यांना जामीनपत्रावर स्वाक्षरी करुन नवीन जामीनपत्र देण्याची आवश्यकता आहे कारण त्यांचे पूर्वीचे जामीनदार शिवराज पाटील यांचं निधन झालं आहे.
राहुल गांधींना दाखवले काळे झेंडे :
दरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे न्यायालयात हजर राहण्यासाठी भिवंडी इथं आले होते. त्यावेळी त्यांना भाजपा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. भाजपानं राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन केलं. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.नवी दिल्लीतील एआय समिटीमध्ये शुक्रवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. त्याचा निषेध म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन करत राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवले.
वकील नारायण अय्यर यांनी माहिती दिली :
काँग्रेस नेत्याचे वकील नारायण अय्यर यांनी पीटीआयला सांगितलं की, “राहुल गांधी यांचे सध्याचे जामीनदार (काँग्रेस नेते) शिवराज पाटील चाकुरकर यांचं 12 डिसेंबर रोजी निधन झाल्यामुळं त्यांना नवीन जामीनपत्र देण्यास सांगण्यात आलं आहे.” या प्रकरणात राहुल गांधी यांना जामीन मंजूर झाला तेव्हा माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील हे जामीनपत्र होते. वकिलांनी स्पष्ट केलं की, न्यायाधीशांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला नवीन जामीनपत्राशी संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
संपूर्ण प्रकरण काय आहे? :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) स्वयंसेवक राजेश कुंटे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती की, 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनाळे गावात एका सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएस असल्याचे म्हणाले होते. भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (बदनामी) अंतर्गत कुंटे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, या खोट्या टिप्पणीमुळं आरएसएसची प्रतिमा मलिन झाली आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान कुंटे यांची उलटतपासणी घेण्यात आली आहे. पुढील सुनावणी सुरुवातीला 20 डिसेंबर 2025 रोजी होणार होती, परंतु नवीन जामीनदाराची आवश्यकता असल्यानं ती 17 जानेवारीपर्यंत पुढं ढकलण्यात आली. 17 जानेवारी रोजी दंडाधिकाऱ्यांनी सुनावणीची तारीख 21 फेब्रुवारीपर्यंत वाढवली.







